आजकाल डेली सोप सोबतच बरेचसे talent shows, reality shows टेलीवीजन मिडीया वर सुरू असतात. मालिकांबरोबरच अशा कार्यक्रमांचा प्रेक्षकवर्गही दांडगा आहे. मग अशा कार्यक्रमांची संकल्पना, त्यांचे स्पर्धात्मक स्वरूप इत्यादी गोष्टी प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. पण मला त्यातील सूत्रसंचालन किंवा anchoring हा भागही महत्वाचा वाटतो. काहीजण इतक्या छान पद्धतीने कार्यक्रमाची आणि प्रेक्षकांचीही पकड घेतात तर काही वायफळ बडबड करून वैतागही आणतात.
काही उदाहरणच द्यायची झाली तर…मराठी सा रे ग म प ची निवेदक पल्लवी जोशी..तशी ती बरयाच वर्षांपासून सूत्रसंचालन करते. पण तीचा पल्ला “एकदा जोरदार टाळ्या होउन जाऊ देत” याच्या पलिकडे काही जात नाही. तीने या कार्यक्रमाद्वारे दोन ट्रेड मार्क केलेत…एक म्हणजे तीचे हे पेटंट वाक्य आणि दूसरं म्हणजे कुठल्याही साडीवर विसंगत ब्लाऊज घालणे. ती संवाद विसरली कि “अमुक साठी जोरदार टाळ्या..तमुक साठी जोरदार टाळ्या” एवढच बोलते. मला मान्य आहे तिला स्क्रिप्ट मिळत असावी पण त्यात तोच तोच पणा आहे हे तीला कळू नये? कबूल आहे कि मुख्य कार्यक्रम गाण्यांचा असतो..तेव्हा फोकस त्याकडे असायला हवा..पण ही मधे मधे येऊन निव्वळ टाळ्या वाजवायला सांगून प्रेक्षकांच्या तोंडाला न्हवे तर हाताला फेस आणते. तीच्या प्रत्येक वाक्यानंतर पुढच वाक्य इतक predictable असत की मी चक्क टि.व्ही म्युट करते. मला हे सुद्धा मान्य आहे की २ मिनिट कैमेरासमोर किंवा व्यासपीठावर उभ राहून निवेदन करायला खूप धाडस लागत..आणि कुणीही ऐरा गैरा नत्थू खैरा ते करू शकत नाही. पण आता इतकी वर्षे टेलीविजन मिडिया मधे काम केल्यानंतर यांनी थोडं आत्मपरिक्षण करायला नको का???
काही महिन्यांपूर्वी सलील कुलकर्णी्ंच्या “आयुष्यावर बोलू काही” हा गाण्यांच्या सुरेख कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आमच्या एका स्वय़ंचलित संस्थेमार्फ़त हा कार्यक्रम मागील ३ वर्षे सलग भरवला जातोय. सुरूवातीची २ वर्षे संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांनी एकत्र हा कार्यक्रम केला होता. तिसरया वर्षी मात्र संदीप खरे न्हवते, पण सूत्रसंचालनासाठी सुनिल बर्वे आले होते. मी स्वत: कार्यक्रमाची सुरूवात, पाहूण्यांची ओळख करून कार्यक्रमाची सूत्र सुनिल बर्वेंच्या हातात दिली. पण स्टेजवर त्यांचा प्रेझेन्स जाणवतच न्हवता. सुनिल सलिलला प्रश्न विचारणार आणि सलिल त्यांची उत्तर देत देत गाण्याचा कार्यक्रम पुढे नेणार अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती. पण सगळा कार्यक्रम सलिलनेच खाऊन टाकला आणि सुनिल फक्त गाण्यांना कोरस देण्याचे काम करत होते आणि सुनिलचे निवेदन सपशेल फसले.
ई-मराठीवर एक विनोद वीरांचा कार्यक्रम लागतो: “कोमेडी एक्सप्रेस” त्याचे निवेदन अम्रुता खानविलकर करते. तिच्याबद्दल मी इथे काही लिहिणे पण जागेचा अपव्यय वाटतो मला. तीचे ते एकसूरी (किंचाळणे) निवेदन म्हणजे त्या कार्यक्रमाला लागलेले गालबोट वाटते. तिने “महाराष्ट्राचा सूपरस्टार” या झी मराठी वरील स्पर्धेचे पण निवेदन केले होते..तेसुद्धा त्याच सूरात…
वरील उदाहरणांवरून मला चांगले निवेदक कधी सापडलेच नाहीत असे मुळीच नाही. रेणुका शहाणेचा “सुरभी” पासून ते “याला जीवन ऐसे नाव” पर्यंतचा प्रवास आपण पाहीला तर तिने किती सुंदर रीत्या निवेदनाचे पैलू उलगडले आहेत हे कळेल. तिचा तो सुरभीमधला निरागसपणा अजूनही टिकून आहे. संपदा कुलकर्णीचेही निवेदन छान वाटते. प्रशांत दामले…एक उत्तम विनोदी अभिनेता… आणि उत्तम निवेदकही…हल्ली एक पाक-क्रुतीचा कार्यक्रम सुत्रसंचालित करतो. अगदी रोज पाहिल तरी त्याची हाताळणी कंटाळवाणी वाटत नाही. (हा प्रत्येक पदार्थ टेस्ट केल्यावर त्याच्या चेहरयावर उमटणारे भाव थोड्या फार फरकाने सारखेच असतात 🙂 )
अनू कपूर हाही एक उत्तम निवेदक आहे..”मेरी आवाज सूनो”, “झी अंताक्षरी”, “स्मार्ट श्रीमती” सारखे कित्येक कार्यक्रम त्याने इतक्या सुरेखरीत्या सादर केले आहेत….त्याच्या निवेदनामधे कमालीचे वैविध्य सापडते आणि त्यामागे त्याचा अभ्यासही दिसून येतो. एके काळी सोनू निगमने हिंदी सा रे ग म प गाजवले होते…त्याची परंपरा शाननेही बरयापैकी राखली. आपले आदेश भाओजी…वहिनी वहिनी करत महाराष्ट्राच्या घरा घरामध्ये शिरले आणि समस्तांच्या मनामधेही. मध्यंतरीच्या काळात जेव्हा भाओजी निवडणूकीच्या रिंगणात उतरले तेव्हा त्यांच्या दोन कार्यक्रमात replacement झाल्या..जितेन्द्र जोशी आणि निर्मीती सावंत…पण आदेश सारखी कामगिरी कुणीही पार पाडू शकल नाही. भाओजी तिथे रिंगणात आपटले आणि इथे त्यांच्या कार्यक्रमांचा टि.आर.पी.
सगळ्यांना कळलं “ज्यानू काम त्यानू…दूजा करे सो गोते खाय.”
अमिताभ बच्चन सारखा एक उमदा कलाकार जेव्हा या क्षेत्रात येतो आणि करोड्पतीसारख्या कार्यक्रमाला लोकप्रियतेच्या अत्त्युच्च उंचीवर नेऊन ठेवतो तेव्हा अगदी गोविंदा, अनुपम खेर, शाहरूख खान पर्यंत सगळे त्याच रिंगणात हात पाय मारून बघतात…. पर ये सबके बसकी बात नही…..
आज काल वी.जे, आर. जे यांच पीक आलय…त्यासाठी talent hunt सुद्धा होतात..पण प्रकर्षाने लक्षात राहील असा एखादाच. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता आणि प्रेझेन्स ओफ माईंड सगळ्यांकडेच नसतो.
ता.क.: काही कंटाळवाण्या आणि ईरिटेटींग निवेदकांनी मल ही पोस्ट लिहिण्यास उद्युक्त केल्याबद्दल त्यांचे आभार.
वरील सर्व मते ही माझी वैयक्तिक असून कुणाबद्द्लहि वैयक्तिक आकस नाही. 🙂