वशीकरण, प्रेम मे या कामकाज मे असफ़लता, सौतन से छुटकारा, भूतबाधा, संतानप्राप्ती तथा अन्य किसीभी समस्या का १००% निश्चित उपाय.. बाबा पाशा बंगाली…..तंत्र मंन्त्र के सम्राट..मेरे किये हुये काम को कोइ काट दे तो उसे नगद इनाम, गेरेंटी कार्ड के साथ समस्या का समाधान इत्यादी इत्यादी….. हुश्श….. केवळ पोस्ट लिहायची म्हणून हे सगळ लक्षात ठेवल होत…
छायाचित्र आंतर्जालावरून साभार
परवा सहज केबलवर ही जाहीरात पाहिली… तशी बरेचदा पाहिली होती पण ही जाहीरात लागली कि मी लगेच चॅनेल बदालायचे पण परवा का कुणास ठाऊक पूर्ण पाहिली.. आणि हसाव कि रडावं ते कळत न्हवतं.. ट्रेनमधे तर या जाहिराती राजरोसपणे सगळ्या डब्यांमधे बेधडक झळकत असतात… तेव्हा आपल्यासारखी मंडळी डोळेभर ह्या जाहीरात वाचतात (किमान मी तरी) आणि मग त्याकडे एक उपेक्षित कटाक्ष टाकून विसरून जातात. पण इतकी वर्षे मी ह्या जाहिराती बघतेय, ऐकतेय म्हणजे या लोकांचा धंदा (हो धंदाच) बरयापैकी चालू असला पाहीजे असा अंदाज आला. आपण (सुशिक्षित) भलेही अगदी अशा बाबांकडे जात नसू पण जेव्हा परिस्थिती आपल्याला हरवते तेव्हा भडजींकडे पत्रिका दाखवणे, वेगवेगळी रत्न अभ्यास न करता वापरणे, यद्न्य हवन करणे, कालसर्प…वगैरे वगैरे(अजून काही असेल तर प्रतिक्रियेत द्या) करतोच की मग अशिक्षित लोकं जी परिस्थितीपुढे झुकतात ती अशा ढोंगी बाबांच्या भुलथापांना बळी पडतात. एखादा माणूस जो १००% खात्री देतो कुठ्ल्याही समस्येचे निवारण करण्याचे, तर त्याच्या विद्येत काहितरी तथ्य असेल असा विचार करून जाणारया माणसांचा वर्गही कमी नसावा.
कारण काहीही असो पण जेव्हा केबल टि.व्ही वर अशा जाहीराती येतात तेव्हा रागही येतो आणि आश्चर्यही वाटतं. कबूल आहे की केबल टी.व्ही हे एक प्रायव्हेट प्रसारमाध्यम आहे पण तरीही सामाजिक स्वास्थ्याप्रती त्यांचीही काहीतरी जबाबदारी आहे की नाही. केवळ जाहीरातीचे पैसे मिळतात म्हणून कुठल्याही ऐरयागैरयाला असे मुक्तपणे अंधश्रद्धेचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य दिले जाऊ नये असे मला वाटते.
हल्ली तर न्यूज चॅनेलसुद्धा अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी फूटेज बिनदिक्कत रोमांचित निवेदनाने सादर करतात. केवळ स्पर्धेत टिकून राहवं, चॅनेलचं टि.आर.पी वाढावं आणि २४ तास काहितरी दाखवत राहाव लागत म्हणून अशा स्टोरीज कव्हर करण आणि लोकांची दिशाभूल करण..केवळ या तत्वावर पत्रकारीतेला धाब्यावर बसवून अशा स्टोरीज अगदी रोजच्या रोज टेलिकास्ट केल्या जातात.
अजून एक गोष्ट अशी जाहिरात करणारे सगळे बाबा करतात ती म्हणजे आपली जाहीरात ते साई बाबांच्या फोटोने करतात. श्री साई सतचरित्रामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे किंवा साई बाबांवर केलेल्या अनेक चित्रपट तथा मालिकांमधून दाखविल्याप्रमाणे साई बाबांनी आपल्या सामर्थ्याने अनेक चमत्कार घडवले. ह्या (ढोंगी बाबा) लोकांनी नेमकी ह्याच गोष्टीची ढाल बनवून स्वताच्या धंद्याचा प्रचार केलाय. ह्याही काळात जर साई बाबा चमत्कार दाखवू शकतात तर आम्ही का नाही…मग आम्ही साईंचेच अंश वगैरे असा ही आभास गि-हाईकांपुढे निर्माण केला जात असावा. पण किमान लोकांनी तरी डोळसपणा दाखवावा…साई बाबांनी चमत्कार दाखवले असतील तर ते लोककल्याणास्तव… त्याचे कधी पैसे नाही घेतले त्यांनी…
मला एक प्रश्न पडला आहे की सरकार किंवा अंधश्रद्धा निर्मूलनवाले या अशा पब्लिकली केल्या गेलेल्या जाहिरांतींविरूद्ध काही कार्यवाही का नाही करत?
अशा बाबांचे अंगारे फुकून जर नोकरी मिळायला लागली तर शिक्षण घ्याच कशाला??? घर बसल्याच नोकरी आणि छोकरी मिळेल की…. 😉
तुमच्या परिचयात अशा कुणा बाबाचा अनुग्रह (हा शब्द उपहासाने वापरतानाही मला हसू आवरत नाहीये…) कुणी घेतला असेल तर अनुभव जरूर शेयर करा.