दिवाळी सण म्हटला कि अगदी २–३ आठवडे आधीपासूनच आपण सर्व हा सण उत्साहाने साजरा करता यावा म्हणून तयारीला लागतो. घराची साफ–सफाई. नवीन कपड्यांची खरेदी, फराळाची रेलचेल, सोने–चांदीची खरेदी, कन्दील, दीपमाळ, पणत्या, सुगन्धी उटणे, रांगोळी इत्यादी इत्यादी….आणि हो “फटाके”
दिवाळी म्हणजे “Festival of lights”. तमसो मां जोतिर्गमय असा संदेश देत सर्व जन मानसांमध्ये चैतन्य आणि उत्साह घेउन येणारा असा हा सण. पण कानठळ्या बसवणारे फट्याकांचे आवाज , जीव गुदमरून जाइल इतकी फ़टाक्यांच्या धूराने प्रदूषित झालेली हवा आणि त्यामुळे वाढलेले तापमान या सणाच्या मांगल्याला गालबोट लावते असे मला वाटते.
लहान मुलांची हौस मौज म्हणून पालक पिशवी फ़ाटेल इतके फटाके खरेदी करून देतात. मुले अजाण असतात आणि या प्रकारातच दिवाळीचा आनंद लुटता येतो असा त्यांचा समज होतो. किंवा अगदी समर्पक बोलायच म्हणजे “माझे सगळे मित्र फटाके लावतात मग मीच का नाही?” मुलांच्या या निरागस हट्टापुढे मात्रा चालेना कुणाची… पण मुलांमधे आणि पालकांमधे देखिल या संबंधित थोडी जाग्रुती व्हायला हवी. महागडे फटाके उडवून पर्यावरणाची हानी करण्यापेक्षा वृक्षारोपण करून त्याची वृद्धी करणे हे केव्हाही एक constructive कार्य आहे. पालकांनी असे विचार मुलांमधे अजाण वयापासूनच रूजवायला हवेत.
फटाक्यांचे आवाज अगदी १०० ते १४० डेसिबलच्या वर जातात हे किती भयंकर आहे. माझ्या ३ महिन्याच्या भाचीची ही पहिलीच दिवाळी म्हणून मोठ्य़ा उत्साहाने आम्ही ती साजरी करायची ठरवली. खूप पाहुणे, मित्र परिवार सुद्धा तीला पाहण्याच्या निमित्ताने दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला घरी आले. पण तीने म्हणावी तशी सणाची मजा लुटली नाही. सारख्या येणा–या फटाक्यांच्या आवाजाने ती दचकून जागी व्हायची आणि आमच्या घरात फटाक्यांच्या आवाजासोबतच तिचा high pitch volume पण घुमायचा. 😉
सण असूनही आम्हाला खिडक्या , बालकनीचे दरवाजे लाउन घ्यायला लागत होते कारण इतका प्रचंड फटाक्यांचा धूर आणि त्यांच्या दारूचा वास यायचा की त्यामुळे आम्हालाच कसेनुसे व्हायचे तर त्या कोवळ्या जीवाची काय कथा?
घरातून खाली डोकावून पाहिले तर पालक आपल्या (अगदि ४ ते १० वयोगटातील) मुलांना घेउन फटाके फोडत असायचे. आता या वयोगटातील मुलाला बॉम्ब , १००-१५० ची लवंगी माळ या अशा अस्त्रांची काय बर तोंड ओळख….पण मुलांचे पालक मात्र आपण जबाबदार असण्याच्या अविर्भावत मुलांचा हाथ पकडून वातीला अगरबत्ती लावायचे… आवाज न करणारे अजून एक हिंस्त्र अस्त्र म्हणजे रॉकेट.. माझ्या एका मित्राने एक किस्सा सांगितला. दिवाळीत त्याच्या बैठया घराच्या खिडकिमधे रॉकेट अडकून बसले होते. आम्ही म्हटल तु झापल का नाहीस मुलांना कारण जर ते खिडकीत न अडकता सरळ घरात आले असते तर?? तर तो म्हणाला “लहान मुलगा असता तर थोडासा दम दिला असता पण पन्नाशी ओलंडलेल्या ग्रुहस्थाला मी काय शहाणपणा शिकवू?” 😉
भाऊबीजेच्या दिवशी आम्ही गाडी घेऊन बाहेर गेलो होतो. एका गल्लीत आल्यावर १०-१५ सेकंदान्नी गाडीचा ब्रेक दाबावा लागत होता. मुले रस्त्यावर फटाके लावत होती. आणि तेही मोठ-मोठे. या अशा प्रकारामुळे अक्सिडेंट व्हायची केवढी मोठी शक्यता असते? अस म्हटल्यावर माझे वडील म्हणाले की या मुलांना कुठे तुमच्यासारखी कॉम्प्लेक्स मधली गार्डन्स आहेत फटाके फोडायला तेव्हा ती रस्त्यावर फोडून आपली दिवाळी साजरी करतात. तेव्हा आपणच जपून गाडी चालवायला हवी. मला काही हे फारस पटल नाही…मी पुन्हा मुळ प्रश्नाकडेच वळले…की मुळात “फटाके उडवूनच दिवाळी साजरी व्हायला हवी का?”
म्हणजे दिवाळीत करायच्या प्रत्येक गोष्टीला म्हणजे “अभंग्यस्नान , रोषणाई, फराळ, रांगोळी इत्यादी इत्यादी यांना त्याच त्याच एक महत्व आहे किंवा काही कारण आहेत जी convincing आहेत. पण “फटाके” या प्रथेच काय कारण आहे?? हे मला अजुनही उमगलेल नाही.
कुणी एका सिने नट जोडप्याने म्हणे दान म्ह्णून क्रेट भरून फटाके गरीब मुलांमधे वाटले. किती उथळ संकल्पना आहे ही?? त्या ऐवजी काही पौष्टीक खाण, चांगके कपडे किंवा पुस्तके अस काही वाटता आल नसत का?
मोठ्या माणसांना चार समजूतीचे शब्द सांगयला जाव तर ते आपल्यालाच अक्कल शिकवतील (काही अपवाद वगळता 🙂 ) त्यापेक्षा कोणती गोष्ट constructive आणि कोणती distructive याचे धडे लहान मुलांना द्यायला हवेत. कारण तेच पुढची पिढी घडवणार आहेत.
तेव्हा किमान पुढच्या दिवाळीला तरी काही लोकांनी बोध घेऊन प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने पाऊले उचलावीत आणि आपल्या बरोबरच इतरांनाही ह्या सणाचा आनंद लुटू द्यावा अशी आशा करूया.