नविन वर्षातली ही पहिलीच पोस्ट आणि त्यातही उपदेशाचे बाळकडू पाजणार की काय ही आता अस वाटून घेऊ नका. काही गोष्टी कशा नकळत लहानपणीच आपल्या अंगवळणी पडतात किंवा कायम स्मृतीत राहतात ते सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न. आमच्या घरात ५ ऑगस्ट २०१० ला जेव्हा ’सान्वी’ नामक एक छोटी परी अवतरली तेव्हा आणि त्यानंतर आजतोवर आम्ही सगळेच तिच्या प्रत्येक हालचालीवर, तिच्यावर होणा-या कुठल्याही चांगल्या वाईट परीणामांवर बारीक लक्ष ठेऊन आहोत. आमचे मोठे बंधूराज आणि वहिनी बाईच पालक म्हणून न्हवे तर माझे आई वडील आणि आत्या म्हणून खुद्द मी सुद्धा…तिने काय पहाव, काय खाव, काय ऐकाव इत्यादी इत्यादी वरून एक मेकांना सल्ले देत असतो.

आम्ही घरातलीच माणस तिच्या आजूबाजूला कायम वावरत असतो त्यामुळे आमच्या चालण्या बोलण्यातून वागण्यातूनच ती शिकत जाणार आणि तिच्यावर संस्कार होत जाणार, हे अगदी स्पष्ट आहे तेव्हा चुकूनही तिच्या समोर बोलताना (अजून जरी ती पाचच महिन्यांची असली तरी) आमच्या तोंडातून चुकीचा शब्द बाहेर येणार नाही याची खबरदारी घ्यायची. माझे वडील म्हणजे सान्वी चे आजोबा तिच्याशी खेळताना, तिला फ़िरवताना कायम जुन्या मराठी कविता, गणपती स्तोत्र, आरत्या, भक्ती गीत म्हणणार जेणेकरून तिच्या कानावर ते पडाव. ती हॉल मधे असताना शक्यतो टी.व्ही. बंदच ठेवणे से आणि असे बरेच अलिखित पण चांगले नियम रुजू होत आहेत.

 हे असे विचार घोळत असताना मी फ़्लॅशबॅक मधे गेले आणि आठवू लागले कि मला कधीही माझ्या आई-वडीलांनी समोर बसवून गणपती स्तोत्र , श्लोक , आरत्या शिकवल्या नाहीत. (अपवाद हा फ़क्त मनाचे श्लोकांचा आहे कारण त्याची स्पर्धा असायची शाळेत म्हणून अगदी घोकून सर्व पाठ केले होते.) मग मला हे सगळे श्लोक, आरत्या, सुभाषित कशी काय माहीत? आई वडील दोघेही नोकरी करणारे असल्यामुळे आमच्या घरात सकाळ ही लवकरच होते..पहाटेच म्हणा हवतर. वडील वॉकला जाउन आले ली आंघोळ करून देवाची पूजा करतात तेव्हा किमान आमच्या कानावर पडतील एवढ्या आवाजात तरी आरती, श्लोक, मंत्र म्हणणार. इथुनच कदाचित आमची शाळा सुरू झाली. लहानअपणीच हे सगळ मला येत होत..अर्थात तेव्हा त्याच अर्थ माहीत न्हवता मला…किंवा वडीलांनी तो समजवण्याचा प्रयत्न केला असता तरी कदाचित पूलावरून पाणी गेल असत त्या वयात. सकाळच रेडीओ वर आमची काम व्हायची. म्हणजे आई सकाळी सकाळी रेडीओ वर मराठी वाहीनी लावायची त्यावर अगदी exact वेळ समजायची. आरोग्यम धनसंपदा सारखे ५ मिनिटांचे कार्यक्रम सुद्धा फ़ार छान असायचे. सकाळच मराठी भक्तीगीत, भावगीत, बातम्या अस सगळ कानावर पडत राहयच. तेव्हा टी.व्ही वर पण दोनच वाहीन्या असायच्या. रामायणाच पर्व मला फ़ारस आठवत नाही पण रविवारी सकाळी लवकर उठून, आंघोळ्या करून आम्ही ’महाभारत” बघायला सहकुटुंब बसायचो हे मात्र मला स्पष्ट आठवतय. सकाळी आम्ही शाळेत आणि आई-पप्पा ऑफीसला गेले की पुन्हा भेट संध्याकळी व्हायची तेव्हा रात्रीच जेवण सगळ्यांनी एकत्रच बसून जेवायच हा दंडक आम्ही अजुनही पाळतो. सकाळी आणि संध्याकाळी अगरबत्तीचा सुवास नाकात नाही गेला तर करमत नाही 🙂 यातून मुलांनी आस्तिकच व्हाव किंवा मूर्तीपूजेला प्राधान्य द्याव हा उद्देश्य नसून एखाद श्रद्धा स्थान असाव असा असू शकतॊ कारण हे सगळ आमच्यावर कधीही लादल गेल नाही ते आपोआपच अंगी रूळत गेल. आणि म्हणूनच हे कधीही आम्हाला सक्तीच वाटल नाही.

 घराच्या भाषेचाही लहान मुलांवर प्रभाव पडतो…भाषेवरून एक किस्सा आठवला. एकदा काही ऑफीसमधले कलिग्स आणि मी गप्पा मारत बसलो असताना भाषेचा विषय निघाला आणि माझा एक लखनऊ चा मित्र म्हणाला “मराठी ही खूप रफ़ भाषा आहे. यात आईला, मोठ्या भावाला, मामांना पण एकेरीत हाक मारतात पण आम्ही सगळ्यांच “जी” लावून बोलावतो. आगदी आईला, मोठ्या भावाला किंवा बहीणीला पण अरे-तुरे करत नाही.” लगेच माझा मराठी अभिमान जागृत झाला कि त्याला केवळ काहीतरी उत्तर द्यायच म्हणून मी म्हटल “हम जिनसे ज्यादा स्नेह रखते है उन्हे अरे-तुरे करते है” (माझ्या म्हिंदी (मराठी कम हिंदी) स्टाईल मधे मी उत्तर हाणल) पण मग काय आम्ही वडीलांशी स्नेह ठेवत नाही की काय?? त्यांना तर आम्ही आदरानेच हाक मारतो. हा प्रत्येक भाषा प्रचलित झाली त्या्चाच एक भाग असावा. यात चूक बरोबर ठरवण थोड कठीण आहे. तुलनात्मक फरक हे असायचेच. असो मुळ मुद्द्यापासून भरकतोय आपण.. माझी आई माझ्या आजोबांना (तिच्या वडीलांना) दादा आणि आईला वहीनी म्हणते कारण तिने तिच्या लहानपणी एकत्र कुटुंब पद्धतीत असताना तिच्या काका काकूंनी नेहमी तिच्या आई-वडीलांना त्याच नावाने संबोधताना ऐकल आणि पुढे तेच follow केल. आज अचानक तिला त्यांना आई-बाबा म्हणायला सांगितल तर अवघडल्यासारख होईल.

सांगायचा मुद्दा हा की खरच लहान मुलं म्हणजे ओल्या मातीच्या गोळ्याप्रमाणेच. यांच्या आजूबाजूच्या लोकांचा, वातावरणाचा नकळत त्यांच्यावर प्रभाव पडत असतो. त्यामुळेच कदाचित आज काल गर्भसंस्काराचेपण क्लासेस चालतात म्हणे… तेव्हा आपल्याच वागण्या बोलण्यातून मुलांच्या मनावर कोवळ्या वयात जे बिंबवले जाते तेच त्यांचे बाळकडू असते.