टॅगस्
काव्य, प्रेम, माझी कविता, लग्न
गाठ माझ्या पदराची तुझ्या उपरण्याला पडली
सप्तपदी चालताना तुझ्यासवे नजर माझी झुकली
लग्नमंडपी शोभा होती परी मनी माझ्या भीती
अनोळखी या नात्याला कशी मी समजू प्रीती
गाली होता विडा परी नयनी माझ्या अश्रू
अंतरपाट मधे स्थिर आणिक समोर उभा तू
हाती पुष्पमाला अन कानी घुमती अष्टके
जन्माचा जोडीदार कसा तू हे पडले मोठे कोडे
पाठवणीची घडी ती मज कठीण बडी जाहली.
माया आई-बाबांची डोळ्यातून वाहली
श्वास माझा अस्थिर होता अन ऊर भरूनी आला
मज न्याहाळूनी हात तू माझ्या हातावरी ठेवला
तुला जपेन असेच निरंतर हे स्पर्शातूनी बोललास
पाणावल्या डोळ्यात तू माझ्या प्रथम सामावलास
नाव तुझे घेऊन सासरचा उंबरठा ओलांडला
घर अपुले फुलवेन सुखाने हा मनी चंग बांधला
कधी रागाने कधी लोभाने नाते जडतच गेले
सहवासाने मनात माझ्या घरटे जणू बांधले
स्पर्श तुझा होताच सा-या विवंचना त्या मिटती
जोडीदार जन्माचा तूच ही पटते मज शाश्वती
दीन हे सरता नकळत कसे अद्भुत नाते जडले
तू नसताना रीतेपणाने मी स्वत:स हरवून बसले
प्रेम माया मित्र सखा मज सारे तुझ्यात दिसले
जीव गुंततो कुणात हे तुलाच पाहूनी कळले
तुझी नी माझी प्रीत सख्या अशीच फुलत राहो
हर एक दिनी नवीन रूपाने नाते हे उलगडो
उन-पावसाचे सारे ऋतू मी तुझ्यासवे पाहीन
सप्तपदीच्या सा-या शपथा नेमाने पाळीन
मस्त…. कविता आवडली, आणि त्यातील भाव अजून जास्त आवडले नव्हे भिडले.
LikeLike
धन्यवाद सुहास..
LikeLike
मी पाहिलंय हे सगळं. आणि माझ्याकडे हार्डडिस्कवर पण आहे 😛
LikeLike
पंकज, तू तर प्रत्येक क्षणाचा अगदी जवळचा साक्षीदार होतास. ते सगळे क्षण तुझ्या कॅमेरयामधे बंधिस्त केल्याबद्दल पुन्हा एकदा आभार….
LikeLike
छान!
LikeLike
kavita khupa aawadali. kadhi nivedanat kiwa bhashanat waparayala upyogi aahe. thanks.
LikeLiked by 1 person