टॅगस्

, ,


सायकलीच्या सीटला धरून धावलास तू

माझ्या वेगाशी वेग धरून लहान झालास तू

तूझच बोट धरल जेव्हा धडपडत पाऊले टाकली

तूझ्याच पोटावर विसावले जेव्हा तीच पाऊले थकली

भातूकलीचा खेळ खेळायला यायला हवास तू

तुझ्या बाहूलीचा संसार पाहायला हवा होतास तू

 

मराठीच्या कविता वारंवार गायचास तू

“गाई पाण्यावर आल्या” गात कुशीत घ्यायचास तू

तुझा कंठ तेव्हाही दाटायचा तो सूर धरताना

त्या वेळी मनात वेगळ घर करायचास तू

तो सूर धरायला , मला कुशीत घ्यायला पुन्हा येना तू

आयुष्याचे गीत गायला अजून हवा होतास तू

 

जेव्हा कधी रागवलास, मनातच भान्डले तुझ्याशी

आजीवन बोलणार नाही असा चंगच बांधला मनाशी

असे कित्येक पण मोडीत काढलेस तुझ्या हळवार स्पर्शाने

तुझ मन मेणाच लगेच पाघळायच माझ्या रागाने

लटका फूगवा राग माझा काढायला हवास तू

हट्ट माझे पूरवायला बाबा हवा आहेस तू

 

हात ओल्या मेहन्दीचे, तर घास भरवलास तू

पाठवणीच्या क्षणाला मनसोक्त रडलास तू

माझ्या मुलीला सांभाळा अस थरथरत बोललास तू

नजरेआड मी होईपर्यंत उभाच ठाकलास तू

काहीतरी सुटल…काहीतरी वीरल , मन माझे मागे धावी

आशीर्वादाचा हात ठेवायला बाबा हवा आहेस तू

 

तूझ्या आठवणी तुझ्याचसारख्या, मला लावी माया

ओठावर हसू, डोळ्यात अश्रू अशी त्यांची किमया

उन पावसाचा खेळ त्यांचा माझ्या मनी चालतो

मग “तू आहेस की नाही” असा वेडा प्रश्न पडतो

शरीराने नसलास तरी सतत जाणवतोस तू

तुझ्या आठवणीतूनच निरंतर जगत राहतोस तू