ऊन्हाळ्याचे दिवस होते. रेडिओवरील ’उठी उठी गोपाळा’ च्या गजरामुळे पहाटेच साखरझोपेने डोळ्यांना सुटी दिली आणि मी रेल्वेच्या टाईमटेबलप्रमाणे अनियमित असाणारया माझ्या प्रभातफेरीला बाहेर पडले. बागेतील शुद्ध हवेचा आस्वाद घेत असतानाच अचानक एका आवाजाने मी थबकले. त्या आवाजाच्या दिशेने गेले आणि तेथील द्रुश्य पाहून चकित झाले. दहा बारा व्रुद्ध मंडळी गोलकार वर्तुळात उभे राहून मोठमोठ्याने हसत होती. त्यांच हसण हे तात्काळ तर्कशुद्ध वाटत नसल तरी तो “लाफ़्टर थेरेपी’ नावाचा व्यायामाचा एक प्रकार आहे हे माझ्या लक्षात आलं.
पण का कुणास ठाऊक सुरकुतलेल्या ओठांवरच ते अकारण हसू माझ्या मनाला एक समाधान देऊन गेलं. आणि मग मी प्रभातफेरीच्या निमित्ताने ज्येष्ठांच्या हास्यसंमेलनाला नेमाने बघ्याची उपस्थिती लाऊ लागले.
त्या दिवशी रविवार होता. पण माझ्या कुंभनिद्रेने घड्याळाच्या कर्णकर्कश्श गजरालाही दाद दिली नाही. उठायला जरा उशिरच झाला. मी कशीबशी लगबगीने बागेत पोहोचले. तोवर सारी व्रुद्ध मंडळी लाकडी बाकांवर विसावली होती. आतापर्यंत त्यातील बरीच जणं माझ्या परिचयाची झाली होती. त्यांच रोजच हसू मी मनसोक्त प्राशन करायचे आणि उगाचच तरतरीत झाल्यासारख वाटायचं. आज मात्र माझ “एनर्जी ड्रिंक” हुकलं म्हणुन मी मनातच फ़ार चुकचुकले.
इतक्यात अचानक हवेत गारवा आला. पावसाचे शितल टपोरे थेंब जणू धरतीच्या स्पर्शासाठी आसूसले होते. तळपत्या ग्रीष्मातली ती पहिलीच सर. अचानक वास्तवाचे भान आले आणि सारी व्रुद्ध मंडळी एका पत्र्याच्या शेडखाली जाऊन बसली…मी ही आत शिरले.
नजर वर करून पाहील तर पावसाकडे एकटक पाहत असलेले जोशी आजोबा दिसले. कसल्यातरी विंवचनेत असल्यासारखे वाटले. इतरांनी विचारणा केल्यावर ते त्यांना काहितरी सांगू लागले आणि कुतुहल म्हणून मी पण त्यांच्या संभाषणाला आपले कान लावले. जोशी आजोबा सरकारी नोकरीत होते. मुलाला मोठ्या प्रयत्नांनी आपल्याच सेक्शनमधे चिकटवले होते त्यांनी. त्याच्या दोन बेडरूम किचनच्या जागेसाठी आपली आयुष्यभराची जमा पुंजी घातली आणि मोबदल्यात त्यांना मिळाला तो त्याच जागेतील एक दुर्लक्षित कोपरा. त्यांना धीर देत रानडे आजोबा आपली व्यथा सांगू लागले. त्यांचा चौदा वर्षांचा नातू त्यांचा अगदी जीव कि प्राण पण तो मात्र त्यांना दुर्लक्षित करतो, टाळतो. त्यांच्याबरोबर कुठेही जायला यायला त्याला लाज वाटते. त्याच्या ह्या अशा वागण्यामागचं प्रश्नचिन्ह त्यांना सतत भेडसावतं. प्रभू आजोबा मात्र त्यातल्या त्यात समाधानी वाटले. स्वत:हूनच मुलाचा संसार वेगळा थाटून दिला. आता मात्र छायागीताप्रमाणे दर रविवारी नातवंडांना भेटायला जातात. सावंत आजी सिजनल आहेत. सावंत आजोबा निवर्तल्यावर दर चार महिन्यांनी त्यांची रवानगी एका लेकाकडून दुसरयाकडे आणि दुसरयाकडून तिसरयाकडे होते. त्यामुळे पावसाळा थोरल्याकडे, हिवाळा मधल्याकडे तर उन्हाळा धाकट्याकडे. पवार आजोबांची तर याहूनही वाईट अवस्था. ईस्टेटी बरोबरच मुलांनी आईवडिलांची सुद्धा वाटणी करून घेतली. सहा सहा महिन्यांनी लाकडी फर्निचर प्रमाणे आईवडिलांची अदलाबदल होते. नेने आजोबा सगळ्यात श्रीमंत, अडिच हजार चौरस फुटाच्या जागेत फ़क्त ईन-मीन-तीन माणसं राहतात. आजोबा, आजी आणि एक गडी. नेने आजोबांचा मुलगा परदेशात ईंजिनियर आहे. नोकरीनिमित्त तिथे गेला आणि आता तिथलाच झाला. खोरयाने पैसा ओढतो आणि न चुकता आई-वडिलांना पाठवतोसुद्धा. पण अखेरीस ठेच लागली तर जखमेला मलम नको पण हाकेला ओ देण्याइतपत तरी त्याने जवळ असावे इतकीच त्यांची माफक अपेक्षा.
कुणाला जवळ पैसा नाही म्हणून आपल्या व्रुद्ध भविष्याची काळजी, तर कुणाला कधी व्रुद्धाश्रमात पाठवणी होईल याची विवंचना, कुणाची ज्येष्ठ नागरीकांच्या सवलती मिळाव्यात म्हणून धडपड, तर कुणाची वेळ जात नाही म्हणून तक्रार. कुणाला प्रक्रुती साथ देत नाही तर कुणाला नशीब. आणि मुख्य म्हणजे कदाचित आता आपल्यावाचून कुणाचं अडतं नाही ही भावना त्यांना सलत असते.
त्या सगळ्यांची कहाणी ऐकून वाटलं रोज जे हसू मला टवटवीत करायचं ते किती वरपांगी आणि पोकळ आहे. ते खदखदत हसू असंख्य कोंदलेली आसवं लपवण्याच एक माध्यम आहे हे माझ्या लक्षात आलं. माझेही डोळे डबडबले आणि पावलं घराकडे वळली पाऊस थांबला होता पण माझ्या मनातला विचारांचा चिखल मात्र अजून तसाच होता.
वाटलं, लहान मुलाला आणि व्रुद्ध माणसाला एक समान मायेची, काळजीची आणि आधाराची गरज असते. एके काळी राब राब राबून आपल्या मुलांच्या तोंडात दोन घास घालणारयांना आता आपल्याला कुणीतरी भरवावं अस वाट्त असतं. त्यांची धडपड असते आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. निसर्गाच्या चक्रातील वार्धक्य हा अंतिम टप्पा आहे हे ते समजून चुअकलेले असतात. आयुष्यभराच्या गोळाबेरजेनंतर किती कमावलं आणि काय गमावलं याचा आलेख ते मांडत असतात. आरशातील ते जीर्ण व्यक्तिमत्वसुद्धा एकेकाळच्या कर्तुत्ववान छबीची साक्ष देत नाही.
जीवनाच्या चढ-उतारांवर अनेक पावसाळे पाहिलेल्या त्या डोळ्यांना ग्रीष्मातला पाऊसही गारवा देऊ शकत नाही. त्यांच्यासाठी ’नेमेचि येतो मग पावसाळा’. त्या सारयांच्या समस्या जरी वरवर वेगवेगळ्या वाटत असल्या तरी त्यांच मूळ एकचं आणि ते म्हणजे वार्धक्य. आता या ग्रीष्मातल्या पावसात कुणाच्या तळहातावर किती थेंब पडणार हे त्या ढगानेच ठरवायचं.
उन्हा-पावसाला सांगायचे, कुणाला किती थेंब वाटायचे
तुझी आसवे ओझरू लागता, खरया पावसाने कुठे जायचे?