middle_class_sign

 

मी तरी काय करू

मिड्ल क्लास म्हटल की उपाधीच वाटते

संस्कारांच्या तिजोरीची किल्लीच भासते

मांडी मारून जेवण्यातच गंमत वाटते

काट्या-चमच्याने न्हवे, बोटांनीच भूक भागते.

मी तरी काय करू

“ब्रॅण्डेड” म्हटल की महागच वाटते

बजेटेड शॉपिंग नेहमीच पटते

घासाघीस केल्याशिवाय खरेदी होत नाही

विकत पिशवी घेण हे बुवा जमत नाही.

मी तरी काय करू

छत्रीच्या तारा अजूनही जोडून आणतो

तुटलेली चप्पल अजूनही शिवून घालतो

जुन्या गोष्टी सोडवत नाही

त्यांच्याशी नाळ काही तोडवत नाही.

मी तरी काय करू

पैसा आला तरी क्लास येत नाही

अकारण पैशाचा माज येत नाही

बस- रेल्वेचा प्रवास अजूनही रुचतो

रोडसाईड वडा-पाव अजूनही पचतो.

मी तरी काय करू

आज-काल गाडीने मी ही फिरतो

पहिल्यापेक्षा सुखवस्तू मी ही राहतो

जगण्याच्या शर्यतीत मी सुद्धा पळतो

पण थकल्यावर जुन्या आठवणीतच शिरतो.

मी तरी काय करू

पैशाने माणसाला तोलत नाही

क्लास पाहून त्यांना जोडत नाही

तरीही माझी वर्गवारी होते

कपड्यांवरून माणसाची किंमत का कळते.