• मी कोण ?

थेट दिल से

~ मनापासून

थेट दिल से

Category Archives: Uncategorized

इमेज

मिड्ल क्लास

01 गुरूवार डिसेंबर 2016

middle_class_sign

 

मी तरी काय करू

मिड्ल क्लास म्हटल की उपाधीच वाटते

संस्कारांच्या तिजोरीची किल्लीच भासते

मांडी मारून जेवण्यातच गंमत वाटते

काट्या-चमच्याने न्हवे, बोटांनीच भूक भागते.

मी तरी काय करू

“ब्रॅण्डेड” म्हटल की महागच वाटते

बजेटेड शॉपिंग नेहमीच पटते

घासाघीस केल्याशिवाय खरेदी होत नाही

विकत पिशवी घेण हे बुवा जमत नाही.

मी तरी काय करू

छत्रीच्या तारा अजूनही जोडून आणतो

तुटलेली चप्पल अजूनही शिवून घालतो

जुन्या गोष्टी सोडवत नाही

त्यांच्याशी नाळ काही तोडवत नाही.

मी तरी काय करू

पैसा आला तरी क्लास येत नाही

अकारण पैशाचा माज येत नाही

बस- रेल्वेचा प्रवास अजूनही रुचतो

रोडसाईड वडा-पाव अजूनही पचतो.

मी तरी काय करू

आज-काल गाडीने मी ही फिरतो

पहिल्यापेक्षा सुखवस्तू मी ही राहतो

जगण्याच्या शर्यतीत मी सुद्धा पळतो

पण थकल्यावर जुन्या आठवणीतच शिरतो.

मी तरी काय करू

पैशाने माणसाला तोलत नाही

क्लास पाहून त्यांना जोडत नाही

तरीही माझी वर्गवारी होते

कपड्यांवरून माणसाची किंमत का कळते.

हे शेअर करा:

  • Email

Like this:

Like Loading...

Posted by truptisalvi | Filed under कवितेचा कुंचला, येता-जाता, Uncategorized

≈ यावर आपले मत नोंदवा

बाबा हवा होतास तू

05 बुधवार ऑक्टोबर 2016

Posted by truptisalvi in कवितेचा कुंचला, Uncategorized

≈ यावर आपले मत नोंदवा

टॅगस्

कवितेचा कुंचला, काव्य, माझी कविता

सायकलीच्या सीटला धरून धावलास तू

माझ्या वेगाशी वेग धरून लहान झालास तू

तूझच बोट धरल जेव्हा धडपडत पाऊले टाकली

तूझ्याच पोटावर विसावले जेव्हा तीच पाऊले थकली

भातूकलीचा खेळ खेळायला यायला हवास तू

तुझ्या बाहूलीचा संसार पाहायला हवा होतास तू

 

मराठीच्या कविता वारंवार गायचास तू

“गाई पाण्यावर आल्या” गात कुशीत घ्यायचास तू

तुझा कंठ तेव्हाही दाटायचा तो सूर धरताना

त्या वेळी मनात वेगळ घर करायचास तू

तो सूर धरायला , मला कुशीत घ्यायला पुन्हा येना तू

आयुष्याचे गीत गायला अजून हवा होतास तू

 

जेव्हा कधी रागवलास, मनातच भान्डले तुझ्याशी

आजीवन बोलणार नाही असा चंगच बांधला मनाशी

असे कित्येक पण मोडीत काढलेस तुझ्या हळवार स्पर्शाने

तुझ मन मेणाच लगेच पाघळायच माझ्या रागाने

लटका फूगवा राग माझा काढायला हवास तू

हट्ट माझे पूरवायला बाबा हवा आहेस तू

 

हात ओल्या मेहन्दीचे, तर घास भरवलास तू

पाठवणीच्या क्षणाला मनसोक्त रडलास तू

माझ्या मुलीला सांभाळा अस थरथरत बोललास तू

नजरेआड मी होईपर्यंत उभाच ठाकलास तू

काहीतरी सुटल…काहीतरी वीरल , मन माझे मागे धावी

आशीर्वादाचा हात ठेवायला बाबा हवा आहेस तू

 

तूझ्या आठवणी तुझ्याचसारख्या, मला लावी माया

ओठावर हसू, डोळ्यात अश्रू अशी त्यांची किमया

उन पावसाचा खेळ त्यांचा माझ्या मनी चालतो

मग “तू आहेस की नाही” असा वेडा प्रश्न पडतो

शरीराने नसलास तरी सतत जाणवतोस तू

तुझ्या आठवणीतूनच निरंतर जगत राहतोस तू

हे शेअर करा:

  • Email

Like this:

Like Loading...

भय इथले संपत नाही…

18 रविवार मार्च 2012

Posted by truptisalvi in येता-जाता, Uncategorized

≈ 4 प्रतिक्रिया

टॅगस्

कॉलेज, परीक्षा, शाळा, शिक्षण

भूताखेताबद्दलचे न्हवे तर न संपणा-या परिक्षांचे. शाळेत असताना वाटायच या सारख्या येणा-या घटक चाचण्या मग सहामाही मग पुन्हा चाचणी आणि मग अजस्त्र अशी भासणारी वार्षिक परीक्षा पाठलागच सोडत नाहीत. एक संपतेय आणि निकालपत्र हाती पडतय ना पडतय तोवर दुसरीचं वेळापत्रक नोटीस बोर्डवर चिकटलेलं. खरतर लेखी पेक्षा तोंडी परिक्षेच्या वेळेसच तोंडच पाणी पळायचं. पेपरात काय लिहितोय हे आपल्यापुरतच फार फार तर तपासणा-या शिक्षकांपुरतच मर्यादीत असायचं, पण तोंडी परीक्षेला संपूर्ण वर्गासमोर आरोपीच्या पिंज-यात उभ केल्यासारख वाटायच. आपला टर्न येउन गेला की मगच दुस-याला तोंडघशी पडताना पाहून मजा वाटायची.

दहावी संपली आणि वाटल आता आपण थोडे मोठे झालो आहोत. कॉलेजला जाणार. तेव्हा तिथल्या आयुष्यासारखच (हिंदी मुव्हीज मधे दाखावतात तस) परीक्षांच वेळापत्रकही “रीलॅक्स्ड” असेल…पण कसल काय…बारावी आणि मग कुठल्यातरी चांगल्या प्रोफेशनल कोर्से साठी (मेडीकल आणि अभियांत्रिकी य दोनच विक्ख्यात प्रक्ख्यात आणि थोरामोठ्यांना माहीत असणा-या शाखा) वाहत्या पाण्यात सूर मारण्याची तयारी सुरू करावी लागली. तेही पार पडल एकदाच.

जस पाषाणयुग, लोहयुग, कलियुग तस काही वर्षांपूर्वी आलेल्या “अभियांत्रिकी” युगातल्या इतर प्राणीमात्रांप्रमाणेच मी सुद्धा एंजिनियरींगला ॲडमिशन घेतल. इथे तर वेगळच विश्व. परिक्षांच स्वरूप सेमिस्टर पॅटर्न मधे बदलल आणि भितीचही.(आणि मजेचही 😉 ) परीक्षेच्या दिवशी “अरे कुछ नही पढा है यार” हे वाक्य दहा पैकी नऊ जणांच्या तोंडी तरी हमखास असायच. आणि निकाल पहायच्या वेळेला “मुखी गोड नाम असावे श्रींचे आणि पोटी उमटावे कड भितीचे” असली कसली गत व्हायची.

“ओरल”…इंजिनियरींगचे विद्यार्थी यावर पानोंपानांचा निबंध लिहू शकतील एवढी या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. “एक्सटर्नल” नामक एरव्ही अतिसामान्य वाटेल असा माणूस ओरलला गव्हर्नर च्या तो-यात खुर्चित बसून आमच्या ज्ञानाची अक्षरश: चिरफाड करायचा. यादिवशी मात्र कॉलेजात हिरोगिरी करणारी पोरंसुद्धा शर्ट इन करून, केसाचा भांग पाडून अगदी सज्जन बनून यायची. जो जास्त बोलण्याच्या फंदात पडला तो गेलाच बाराच्या भावात. जी कोणी मुलं ओरल देऊन बाहेर यायची, बाकीच्या मुलांचा घोळका त्यांच्या भोवती जमायचा. ” ए क्या पुछा? बता ना…” मग त्याने सांगितलेल्या प्रश्नोंत्तरांची शोधाशोध सुरू व्हायची. एखादा त्यातलाच कथाकार निघाला तर आत घडलेल्या आणि न घडलेल्या अशा दोन्हीही कथा अगदी रंगवून रंगवून सांगायचा.

नग समजल्या जाणा-या आणि प्रोफेसरांच्या डोळ्यात खुपणा-या मुलांचा चांगलाच उद्धार ओरलमधे व्हायचा. (आता प्रोफेसर लोकांना विचित्र विचित्र पाळीव नाव (पेट नेम्स) ठेवून त्यांना कॉलेजभर प्रसिद्ध केल्यावर काय यांच कोड-कौतुक होणार आहे?) पण गप्प बसतील तर ती अवली मुलं कुठली? कॉलेजच्या ॲन्युअल गॅदरींगला स्वत:च अनामिक नावाने असे काही फ़िशपोंड लिहायची की प्रोफेसर ओशाळून लाल-लाल झालेच पाहिजेत. तेव्हा एरव्ही गुणापत्रिका पाहून यांच्या बौद्धिक क्षमतेवर शंका घ्यावी की यांच्या कवी मनाने घेतलेल्या भरारीच कौतुक कराव हा प्रश्न पडायचा.

असो विषयांतर होतय. तर अशीही परीक्षेची भिती डिग्री नंतर संपवून टाकायची अस ठरवल आणि नोकरी धरली. इथेही ट्रेनी म्हणून दाखला मिळाला आणि चांगल प्रोजेक्ट मिळाव म्हणून परीक्षा सत्र सुरूच. 🙂

शाळा कॉलेज संपल तरी आजही मला परीक्षेची स्वप्न पडतात ज्यात शेवटच्या क्षणापर्यंत माझा काहिही अभ्यास झालेला नसतो आणि मी फक्त पुस्तकांची पान पलटत असते. मला खात्री आहे तुमच्यापैकी ब-याच जणांना थोड्या फार फरकाने ही अशी स्वप्न पडतच असणार.

व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्हीही पातळींवर आपण नेहमीच अशा परीक्षांना तोंड देत असतो. फक्त त्यांच आणि त्यांच्या ब्रोबर येणा-या भितीच स्वरूप वेगवेगळ असत. घटक चाचणीपासून ते अगदी वधू-वर परीक्षेपर्यंत आपल्या गुणांचा (आणि अवगुणांचाही 🙂 ) कस लागत असतो. कधी डिस्टिंक्शन , कधी फर्स्ट क्लास मिळवून तर कधी अपयशाची पहिली, दुसरी, तिसरी…जोपर्यंत यश मिळत नाही तोवर पाय-या चढत चढत वर जात रहायचं.

 

हे शेअर करा:

  • Email

Like this:

Like Loading...

सी वर्ल्ड आणि रिवर ट्यूबिंग

06 गुरूवार ऑक्टोबर 2011

Posted by truptisalvi in Uncategorized

≈ यावर आपले मत नोंदवा

लेबर डे वीकएण्डचा काहिच प्लॅन ठरला न्हवता. पण डॅलस मधले बहुतेक सगळेच मित्र मैत्रिणी कुठे ना कुठे तरी बाहेर जातच होते. आम्ही मात्र मूवीज़, हॉटेलिंग आणि लोंग ड्राईव्ह एवढाच प्लॅन केला होता. आणि अचानक शुक्रवारी दुपारी अहोन्चा फ़ोन येतो विचारायला की आपण सॅन आंटोनीयोला जायच का?
सॅन आंटोनीयो म्हणजे अरविंग पासून किमान ४ ते ५ तासाची ड्राईव्ह (रस्त्यावरिल वेग मर्यादांच पालन केल तर 🙂 ) मी लगेच सम्मति दर्शविली. आमचे अज़ून २ मित्र यायला तयार झाले. अहोन्नी लगेच मेरीयट मधे २ रूम्स बुक केल्या आणि सी वर्ल्ड ची चार टिकेट्स सुद्धा. शुक्रवारी सन्ध्याकाळी ६.३0 ला सगळे आमच्याच घरी जेवायला आले. मग मीही पुलाव, कढी, सलाद आणि पापड असा झटपट मेनू तयार केला आणि पॅकिंग केल.

साधारण ७.४५ ला आम्ही प्रवास सुरू केला. गाणी, गप्पा, खादाडी करत आम्ही रात्री १.३0 च्या सुमारास होटेल वर पोहचलो. सगळी ओपन पार्किंग्स गाड्यान्नी भरलेली होती. शेवटी होटेल समोरच्या मिटर पार्किंग मधे गाड़ी लाऊन आम्ही रूम वर गेलो. दुस-या दिवशी सकाळी ८ पर्यंतच आम्ही मीटर पार्किंग करायच ठरवल होत. पण रात्री आधीच उशीर झाल्याने सकाळी सगळे ब्रेकफास्ट्लाच ८ ला उतरले 🙂 मग अज़ून १ तासाच पार्किंग घेऊन आम्ही ९ ला सी वर्ल्ड ला जायला निघालो.
मी फारच उत्साहीत होते कारण राइड्स मधे बसायला मला खूप आवडत. अगदी जत्रेतल्या आकाश पाळण्यात सुद्धा. पण सी वर्ल्ड म्हणजे फफ्त राइड्स नाहीत. खरतर राइड्स हाताच्या बोटान्वर मोजता येतिल एवढ्याच आहेत पण त्या जर त्यान्च्या आकारमानाच्या चढत्या क्रमाने केल्या तर हृदयाचे ठोके पण तेवढ्याच चढत्या क्रमाने वाढलेले जाणवतात. 🙂
सर्वप्रथम आम्ही एक ४-डी शो पाहायला गेलो त्याच नाव होत “Sesame Street Presents Lights, Camera, Imagination in 4-D”. हा लहान मुलान्साठीचा शो होता. त्यात ४-डी चे इफेक्ट्स चांगले होते पण त्याचे कथानक आणि कार्टून पात्र अगदिच माफ़ होती. आम्हा चौघान्नाही तो शो काही विशेष आवडला नाही. असो, पण यापुढची सी वर्ल्ड मधली आमची सफ़र फारच रोमांचक होती.

Penguin Encounter,Rocky Point Preserve,Flamingo Cove,Alligator Alley,Boardwalk Games,Cannery Row Caper,Seafari Tour,
Dolphin Cove ईत्यादी ईत्यादी अशी एक ना अनेक आकर्षणे अगदी मजेशीर होती. राइड्स मात्र आम्ही शिल्लक ठेवल्या होत्या कारण त्यावर आधी बसायाच की सन्ध्याकाळी यावर एकमत होत नव्हत.

इतकी सगळी सफ़र केल्यावर आणि उन्हातून नकाशा घेऊन भटकल्यावर सपाटून भूक लागली होती. सकाळचा कोन्टिनेन्टल ब्रेकफ़ास्ट कुठल्या कुठे गुडूप झाला होता. मग कुठे खायच हे सुद्धा नकाशा बघूनच ठरवल आणि रोसिटा केफे मधे गेलो. i must say one of my best eating experiences. बफ़े लंच होता… 12 डॉलर मधे अनलिमिटेड पिझ्झा, पास्ता, सलाद आणि सोफ्ट ड्रिंक्स. पिझ्झाचेच किमान ७-८ प्रकार, आवडीप्रमाणे पास्ताचे प्रकार आणि ड्रेसिंग्स आणि सलाद. पास्ताची चव अजूनही जिभेवर रेन्गाळतेय. सगळ्यान्नीच आडवा हात मारला म्हणूनच कुणाला त्या डिशेसचे फोटो घ्यायला सुचले नाही 🙂 पण फक्त एक आठवण म्हणून मन आणि पोट तृप्त झाल्यावर बाहेरूनच केफे चा तेवढा फोटो आम्ही न चुकता काढला.

This slideshow requires JavaScript.

आता अगदी आकन्ठ जेवण झाल्यावर राइड्स मधे तर आम्ही बसूच शकत न्हवतो. म्हणून तिकड़चे एक ख़ास आकर्षण “The Shamu Show” बसून पाहायच आम्ही ठरवल. पण लोकेशन ला पोहचेपर्यन्त स्टेडीयम खचाखच भरल होत. ट्रेन मधे मिळते तशी चौथी सीट पण नाही मिळाली 😦 त्यामुळे माना उन्च करून शो पाहिला पण त्याची मज़ा नाही लुटता आली. म्हणून सन्ध्याकाळी ६ चा रिपिट शो न चुकता अगदी पुढच्या रान्गेत बसून बघायचा ठरवल. मग थोड़े बोर्ड वॉक गेम्स खेळलो. त्यात कुणालाही काहीही जिंकता आल नाही.
आता ती वेळ आली होती जेव्हा मला राइड्स वर बसण्याची अती उत्कट इच्छा होत होती. आणि धीर गोळा करण्यासाठी आम्ही धोक्याच्या पातळीच्या चढत्या क्रमाने एक एक करून राइड्स वर गेलो. Rio Loco,Journey to Atlantis,Quick Queue,great white आणि सगळ्यात जास्त ठोके वाढले ते “Steel Eel” मधे.
त्यातून बाहेर आल्यावर आणि वर मान करून त्या विशाल स्ट्रक्चर कड़े बघून पुटपुटलो This is utter non sense we have done in our life. मग त्याचे स्ट्रक्चरल ईंजीनियरींग, सेफ्टी मेजर्स, हझार्ड लिमिट्स ईत्यादी ईत्यादी वर चर्चा सत्र सुरू झाले. चार ईंजीनियरींग डोकी एकत्र आल्यावर दूसर काय होणार.
सन्ध्याकाळचे चे ५.३0 वाजले होते आणि आता आम्हाला पुढे बसून शामू शो पाहायचा होता. मी आणि अहोन्नी धावत जाऊन सीट अडवायच ठरवल आणि दूसरे दोघे आइसक्रीम आणि पाण्याच्या बाटल्या आणायला गेले. ६ वाजता शो सुरू झाला आणि आम्ही त्यात रंगून गेलो.

जाता जाता एक शेवटच आकर्षण म्हणून फायर क्रॅकर शो बघायचा की परत जाऊन “River Walk” म्हणून अज़ून एक आकर्षण कवर क़रायच यावर चर्चा झाल्यावर River Walk लाच जायच ठरल. कुठल्याही कनाल साईड सफ़री सारखाच हा रिवर वॉक होता अगदी यूरोप मधे युथ्रेट किंवा आम्सटरडॅम सारख्या ठिकाणी पाहायला मिळाला तसाच पण हा रिवर वॉक तुलनेने अगदिच हलका वाटला. कदाचित् रात्र होवून आता परत इंधन भरायाची वेळ झाली होती म्हणून की काय कनालला पूर्ण वळसा घालायच्या फंदात आम्ही पडलो नाही आणि इतरत्र दिसत असणा-या नेमकया कुठल्या कुजीन मधे धाड़ टाकायची यावर वाद सुरू झाले.
शेवटी “Chilli’s” मधे गेलो. आधीच वेटिंग होत त्यात टेबल मिळाल्यावर साधारण ४५ मिनिटान्नी ओर्डर आली.
आता पुढे काय?? होटेलच बुकिंग एक रात्र आणि एक दिवस अस केल होत पण आता दिवसभराच्या थकव्यामुळे आहोन्नी पुन्हा ५ तास ड्राईव करायला स्पष्ट नकार दिला. आणि जर एक रात्र वाढणार असेल तर दुसर्या दिवशी सकाळी वाटेतच ऑस्टिनला जायाचा प्लॅन ठरला.
Austin is the city of universities पण उन्हातून साईट सिनिंग करायाची कुणाचीच ईच्छा न्हवती म्हणून आम्ही रिवर ट्युबिंग ला जायच ठरवल. सकाळी उठून आम्ही ऑस्टिन रिवर ट्युबिंग ला गेलो. ट्युबिंग चा मार्ग आणि तंत्र तेथिल ट्यूब विक्रेत्याकडून समजावून घेऊन ५ ट्यूब्ससकट आम्ही नदिकडे निघालो. पाचवी ट्यूब खादाडी आणि पाण्याच्या बाटल्यांच कूलर ठेवायला घेतली होती.
सुरुवातीला आमच्यापैकी कुणालाच ट्यूब ला फ्लोट करता येत न्हवत. जवळ जवळ अर्धा तास तर आम्ही दूसरयांकड़े बघत ट्यूबला वल्हवायच कस हे शिकत होतो. आमची नाव मात्र उलट्याच दिशेने जात होती 🙂 हळू हळू जमायला लागल आणि मग yeah its not a rocket science असे उद्गार बाहेर आले.

आहोंनी नको नको म्हणत असताना आठवणी साठवण्याच्या नावाखाली मी कॅमरा ट्यूब मधे आणला होता. आणि नेमका एंड पॉइंट ला उतरताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे मी कमरेपेक्षा अधिक उन्चीच्या पाण्यात लॅंडिंग केल. कमरेला अडकवलेला कॅमरा कवरसकट पाण्याखाली….
बाहेर आल्यावर माझी काही खैर नाही हे मला कळून चुकले होते. घाबरत घाबरत मी कॅमरा ऑन करण्याचा प्रयत्न केला आणि व्हायच तेच झाल होत. 😦 मग पटकन मेमरी कार्ड आणि बॅटरी काढून कॅमरा वेगळा ठेवला. मला संपूर्ण सहलीलाच गालबोट लागल्यासारखे झाले.
मी नाराज़ होते पण सगळे म्हणत होते की कॅमरा सुकला की ठीक होइल. अहोन्नी हळूच “बघ नवा-याच ऐकल नाही की अस होत” असा टोला मारला.

रिवर ट्युबिंगचे तन्त्र कळले की मगच त्याचा आस्वाद घेता येतो. नेविगेशन, सेलिंग, प्रवाहाबरोबर फ्लोट होणे यात खूप व्यायाम झाला. दंड दुखायला लागले. आता कुठेही न थान्बता थेट अरविंग गाठायच ठरल. गणपतिचे दिवस होते आणि एका स्नेहींकड़े दिड दिवसाचे गणपति होते. त्यान्नी फ़ोन करुन परस्पर घरी गणपतीला आणि रात्रीच्या जेवणाला आमन्त्रण केले. आम्ही साधारण ४.३0 तासाने ८.३0 च्या दरम्यान त्यान्च्याकडे पोहचलो. आरती केली आणि साबुदाणे वडे, ढोकळा, चटणी, पुलाव आणि मोदक असा उत्तम आहार केला. थेट घरी जाऊन सगळेच घोड़े विकुन झोपले (घोड़े बेचके सो गये). 🙂

ता.क. कॅमरा ३ दिवसांनी पूर्ण सुकल्यावर पूर्ववत झाला. आणि ख-या अर्थाने ही सहल महागात पडली नाही 🙂

हे शेअर करा:

  • Email

Like this:

Like Loading...

अनाम प्रेम

27 रविवार फेब्रुवारी 2011

Posted by truptisalvi in Uncategorized

≈ 4 प्रतिक्रिया

नाही या पोस्ट मधे कुठलीही प्रेम कथा लिहिलेली नाही.

परवा ऑटो मधून घरी येत असताना या नावाने आणि त्या खालच्या मजकुराने माझी नजर रिक्षा ड्राइवर च्या सीट च्या मागे लावलेल्या पोस्टरने  खिळवून ठेवली. मला हसू आवरले नाही. पण मी एकटीच रिक्षात असल्याने ड्राइवर वेडी समजून मला खाली उतरवेल या भीतीने मी मनातल्या मनातच खदखदून हसले (हे मी समस्त रिक्षावाल्यांची माफी मागून लिहिते…पण हसू आवरल नाही मला)

त्या पोस्टरचा लगेच फोटो काढावासा वाटला. पण रात्र असल्याने आणि माझ्या मोबाइल च्या कॅमे-याला फ्लॅश नसल्याने फोटो निटसा आला नाही. तरीही अपलोड करते.

 
 खर तर नवीन वर्षाचा संकल्प केला होता शक्यतो रिक्षाने प्रवास करणार नाही पण माझा हा संकल्प दोन दिवासांपेक्षा जास्त नाही टिकला. 🙂 मुंबईत राहून आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाने रिक्षाने प्रवास करण टाळणे म्हणजे थोडे कठीणच…

आपल्याला कुठेतरी जायला उशीर झालाय आणि अशा वेळिस तातडीने रिक्षा मिळणे आवश्यक असते तेव्हाच…एकतर रिक्षा मिळत नाही(यालाही बरीच कारण असू शकतात ती पुढे सविस्तर मांडते) किंवा मिळालीच तर रिक्षावाला तुम्हाला तिकडे नेण्यासाठी नकार देतो (यालाही बरीच करणे असू शकतात 🙂 ) तेव्हा आपला ज्वरबिंदू किती उच्च होत असेल याची कल्पना आपल्यापैकी प्रत्येकालाच असते.  रिक्षा (वाले) आणि पॅसेंजर्स याबाबतीत आढळणारे काही कॉँमन प्रसंग….

तुम्ही रिक्षाची वाट बघत उभे आहात. येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक रिक्षा मधे डोकावून ती रिकामी आहे की नाही याची शहानिशा करताय. अशा वेळी

 1) एक रिक्षा थांबते. रिक्षावाला मानेनेच “किधर” अशी खूण करतो.
  
तुम्ही : अमुक अमुक जगह चालना है (आणि वाकून एक पाय रिक्षात टाकता)
 

रिक्षावला : उधर नही जाएगा (आणि लगेच अ‍ॅक्सेलरेटर वाढवतो)

तुम्ही : *#@#**$$

 2) एक रिक्षा तुम्हाला बघून तिचा वेग कमी करते. तुमच्या दिशेने येऊ लागते.

 तुम्ही(मनाशी) : हूश्श चला मिळाली नाहीतर उशिरच झाला असता. तुम्ही असे बोलून देवाचे आभार मानतच असता इतक्यात रिक्षावला तुमच्या थोडस पुढेच उभ्या असलेल्या सुंदर तरुणीच्या पुढयात रिक्षा थांबवतो. ती त्यात बसते आणि तुम्ही मात्र ती रिक्षा डोळ्याआड होईपर्यंत तिच्या पाठमो-या आकृतीकडे पाहत राहता
  
तुम्ही : *#@#**$$

3) एक रिक्षा येते आणि तुमच्या पुढयात थांबते.  

रिक्षावला: (गुटखा चघळत तुमच्यावर उपकार केल्याच्या अविर्भावात) “किधर जानेका?”

 तुम्ही : अमुक अमुक वेस्ट

रिक्षावला: (दोन मिनिट विचार करत आणि गुटखा रवंथ करत) “हम्म” (म्हणजे बैठो)

 अर्ध्या रस्त्यात

रिक्षावला: साहब गॅस खतम हो गया है उतरो

तुम्ही : अरे ऐसे कैसे खतम हो गया. अभी तो आधा रस्ता भी नही आए.

रिक्षावला: साहब ये कोई मोबाइल का टॉकटाईम है जो चेक करू…गॅस है खतम हो रहा है.

तुम्ही : अब मुझे यहा ऐसी जगह पे दुसरी रिक्षा भी नही मिलेगी

(रिक्षावल्याच्या गालतली खळी बघून तुमच्या डोक्याची शीर चढते तुम्ही मु्काट पैसे देऊन दुसरीच्या शोधात वण वण करता)

तुम्ही: *#@#**$$

 इत्यादी इत्यादी. मुद्दाम दुस-या पात्राचा उल्लेख मी पुरु्षार्थी केलाय कारण मुलींना हे अनुभव कमी येतात.  (पण मुलींनादेखील कधी कधी काही वात्रट रिक्षावाल्यांचा त्रास सहन करावा लागतो स्पेशली त्या सगळ्यात जास्त इरिटेट होत असतात त्या रिक्षावाल्यांच्या डोक्यावर लावलेल्या “स्पेशली अड्जेस्टेड” लांबट आयताकृती आरशांना)
  
जशी हाताची सगळीच बोट सारखी नसतात तसे सगळेच रिक्षावाले काही वर उल्लेख केल्याप्रमाणे नसतात.  काही सभ्य, वाहतुकीचे नियम पाळणारे, सर्व पॅसेंजर्स ना समान वागणूक देणारेही आहेत. आणि त्यांचेही चांगले अनुभव आपल्याला येत असतात
 
 
जेव्हा तो “अनाम प्रेम” चा पोस्टर मी रिक्षा च्या मागे वाचला तेव्हा घरी येऊन गूगल केले की हे “अनाम प्रेम” काय प्रकरण आहे? कुठली संस्था आहे की दुसर काहीतरी? तेव्हा मला मुंबई मिरर मधला हा लेख दिसला.

http://www.mumbaimirror.com/index.aspx?age=article&sectid=2&contentid=20100129201001290304295763ecbd1c2

 या लिंक मधे लिहिलेली हिंदीमधली त्रिसूत्री मराठीत अतिरंजित करून भाषांतरीत केली गेली आहे.
त्यात रिक्षावाल्यांच्याही काही जेन्यूईन अडचणी असतात भाड न घेण्यामागे असा एका ड्राइवर ने संगितलय जशा
 
1)रिक्षा मधे इंधन कमी असणे

2)लंच अवर्स 

3)पॅसेंजर ला जिथे जायचय तिथे पार्किंग साठी सुविधा नसणे इत्यादी.

पण अशी कारणं नसतानाही कित्येकदा ते सरळ सरळ नकार देऊन निघून जातात. बर सगळेच पॅसेंजर त्यांना आदरार्थी वागणूक देत असतील अस मला म्हणायच नाही. हो पण रिक्षा वाल्याने जर योग्य ठिकाणी व्यवस्थित नेऊन सोडल तर त्याला नुसत “थॅक्स” म्हणायला आपल काहीच जात नाही. मी स्वतः तस म्हणते (ते पोस्टर पाहायच्या आधी पासून) (प्रोवाइडेड तो रिक्षावला सभ्य वाटला तरच) अगदी बस मधल्या कंडक्टरलाही. तुम्ही म्हणाल थॅक्स कशाला म्हणायला हव ते त्यांच कामच आहे पण दिवसभर अशी वण वण करणार्‍या कंडक्टर किंवा रिक्षावाल्याला थॅक्स म्हटल तर बिघडल तरी कुठे. एक प्रकारच सौजन्य दाखवायच बस…

 पण या अनाम प्रेम संस्थेचे जे कुणी अनुयायी असतील त्यांना माझी एकच विनंती आहे की त्यांनी रिक्षा चालकांसाठी ही अस एखाद पोस्टर बनवाव….ज्यात रिक्षा चालकांनी काय कराव आणि काय करू नये याचे उपदेश त्यांनाही द्यावेत. टाळी एका हाताने वाजत नसते.

हे शेअर करा:

  • Email

Like this:

Like Loading...

बाळकडू

22 शनिवार जानेवारी 2011

Posted by truptisalvi in Uncategorized

≈ यावर आपले मत नोंदवा

नविन वर्षातली ही पहिलीच पोस्ट आणि त्यातही उपदेशाचे बाळकडू पाजणार की काय ही आता अस वाटून घेऊ नका. काही गोष्टी कशा नकळत लहानपणीच आपल्या अंगवळणी पडतात किंवा कायम स्मृतीत राहतात ते सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न. आमच्या घरात ५ ऑगस्ट २०१० ला जेव्हा ’सान्वी’ नामक एक छोटी परी अवतरली तेव्हा आणि त्यानंतर आजतोवर आम्ही सगळेच तिच्या प्रत्येक हालचालीवर, तिच्यावर होणा-या कुठल्याही चांगल्या वाईट परीणामांवर बारीक लक्ष ठेऊन आहोत. आमचे मोठे बंधूराज आणि वहिनी बाईच पालक म्हणून न्हवे तर माझे आई वडील आणि आत्या म्हणून खुद्द मी सुद्धा…तिने काय पहाव, काय खाव, काय ऐकाव इत्यादी इत्यादी वरून एक मेकांना सल्ले देत असतो.

आम्ही घरातलीच माणस तिच्या आजूबाजूला कायम वावरत असतो त्यामुळे आमच्या चालण्या बोलण्यातून वागण्यातूनच ती शिकत जाणार आणि तिच्यावर संस्कार होत जाणार, हे अगदी स्पष्ट आहे तेव्हा चुकूनही तिच्या समोर बोलताना (अजून जरी ती पाचच महिन्यांची असली तरी) आमच्या तोंडातून चुकीचा शब्द बाहेर येणार नाही याची खबरदारी घ्यायची. माझे वडील म्हणजे सान्वी चे आजोबा तिच्याशी खेळताना, तिला फ़िरवताना कायम जुन्या मराठी कविता, गणपती स्तोत्र, आरत्या, भक्ती गीत म्हणणार जेणेकरून तिच्या कानावर ते पडाव. ती हॉल मधे असताना शक्यतो टी.व्ही. बंदच ठेवणे से आणि असे बरेच अलिखित पण चांगले नियम रुजू होत आहेत.

 हे असे विचार घोळत असताना मी फ़्लॅशबॅक मधे गेले आणि आठवू लागले कि मला कधीही माझ्या आई-वडीलांनी समोर बसवून गणपती स्तोत्र , श्लोक , आरत्या शिकवल्या नाहीत. (अपवाद हा फ़क्त मनाचे श्लोकांचा आहे कारण त्याची स्पर्धा असायची शाळेत म्हणून अगदी घोकून सर्व पाठ केले होते.) मग मला हे सगळे श्लोक, आरत्या, सुभाषित कशी काय माहीत? आई वडील दोघेही नोकरी करणारे असल्यामुळे आमच्या घरात सकाळ ही लवकरच होते..पहाटेच म्हणा हवतर. वडील वॉकला जाउन आले ली आंघोळ करून देवाची पूजा करतात तेव्हा किमान आमच्या कानावर पडतील एवढ्या आवाजात तरी आरती, श्लोक, मंत्र म्हणणार. इथुनच कदाचित आमची शाळा सुरू झाली. लहानअपणीच हे सगळ मला येत होत..अर्थात तेव्हा त्याच अर्थ माहीत न्हवता मला…किंवा वडीलांनी तो समजवण्याचा प्रयत्न केला असता तरी कदाचित पूलावरून पाणी गेल असत त्या वयात. सकाळच रेडीओ वर आमची काम व्हायची. म्हणजे आई सकाळी सकाळी रेडीओ वर मराठी वाहीनी लावायची त्यावर अगदी exact वेळ समजायची. आरोग्यम धनसंपदा सारखे ५ मिनिटांचे कार्यक्रम सुद्धा फ़ार छान असायचे. सकाळच मराठी भक्तीगीत, भावगीत, बातम्या अस सगळ कानावर पडत राहयच. तेव्हा टी.व्ही वर पण दोनच वाहीन्या असायच्या. रामायणाच पर्व मला फ़ारस आठवत नाही पण रविवारी सकाळी लवकर उठून, आंघोळ्या करून आम्ही ’महाभारत” बघायला सहकुटुंब बसायचो हे मात्र मला स्पष्ट आठवतय. सकाळी आम्ही शाळेत आणि आई-पप्पा ऑफीसला गेले की पुन्हा भेट संध्याकळी व्हायची तेव्हा रात्रीच जेवण सगळ्यांनी एकत्रच बसून जेवायच हा दंडक आम्ही अजुनही पाळतो. सकाळी आणि संध्याकाळी अगरबत्तीचा सुवास नाकात नाही गेला तर करमत नाही 🙂 यातून मुलांनी आस्तिकच व्हाव किंवा मूर्तीपूजेला प्राधान्य द्याव हा उद्देश्य नसून एखाद श्रद्धा स्थान असाव असा असू शकतॊ कारण हे सगळ आमच्यावर कधीही लादल गेल नाही ते आपोआपच अंगी रूळत गेल. आणि म्हणूनच हे कधीही आम्हाला सक्तीच वाटल नाही.

 घराच्या भाषेचाही लहान मुलांवर प्रभाव पडतो…भाषेवरून एक किस्सा आठवला. एकदा काही ऑफीसमधले कलिग्स आणि मी गप्पा मारत बसलो असताना भाषेचा विषय निघाला आणि माझा एक लखनऊ चा मित्र म्हणाला “मराठी ही खूप रफ़ भाषा आहे. यात आईला, मोठ्या भावाला, मामांना पण एकेरीत हाक मारतात पण आम्ही सगळ्यांच “जी” लावून बोलावतो. आगदी आईला, मोठ्या भावाला किंवा बहीणीला पण अरे-तुरे करत नाही.” लगेच माझा मराठी अभिमान जागृत झाला कि त्याला केवळ काहीतरी उत्तर द्यायच म्हणून मी म्हटल “हम जिनसे ज्यादा स्नेह रखते है उन्हे अरे-तुरे करते है” (माझ्या म्हिंदी (मराठी कम हिंदी) स्टाईल मधे मी उत्तर हाणल) पण मग काय आम्ही वडीलांशी स्नेह ठेवत नाही की काय?? त्यांना तर आम्ही आदरानेच हाक मारतो. हा प्रत्येक भाषा प्रचलित झाली त्या्चाच एक भाग असावा. यात चूक बरोबर ठरवण थोड कठीण आहे. तुलनात्मक फरक हे असायचेच. असो मुळ मुद्द्यापासून भरकतोय आपण.. माझी आई माझ्या आजोबांना (तिच्या वडीलांना) दादा आणि आईला वहीनी म्हणते कारण तिने तिच्या लहानपणी एकत्र कुटुंब पद्धतीत असताना तिच्या काका काकूंनी नेहमी तिच्या आई-वडीलांना त्याच नावाने संबोधताना ऐकल आणि पुढे तेच follow केल. आज अचानक तिला त्यांना आई-बाबा म्हणायला सांगितल तर अवघडल्यासारख होईल.

सांगायचा मुद्दा हा की खरच लहान मुलं म्हणजे ओल्या मातीच्या गोळ्याप्रमाणेच. यांच्या आजूबाजूच्या लोकांचा, वातावरणाचा नकळत त्यांच्यावर प्रभाव पडत असतो. त्यामुळेच कदाचित आज काल गर्भसंस्काराचेपण क्लासेस चालतात म्हणे… तेव्हा आपल्याच वागण्या बोलण्यातून मुलांच्या मनावर कोवळ्या वयात जे बिंबवले जाते तेच त्यांचे बाळकडू असते.

हे शेअर करा:

  • Email

Like this:

Like Loading...

माझी आई सुपरवुमन

01 सोमवार नोव्हेंबर 2010

Posted by truptisalvi in Uncategorized

≈ 4 प्रतिक्रिया

बरेच दिवसांनी आज जुनी डायरी वाचत होते……जुनी म्हणजे अगदी ८ वी पासून ते बारावी पर्यंत असताना लिहिलेली. म्हणजे ती काही रोजनीशी नव्हती. मनाला वाटेल तेव्हा लिहाव, असा प्रकार होता तो. त्यात अकरावीला असताना आई बद्दल मी खूप लिहिल होत. ते वाचताना डोळ्यातून पाणी आल. त्या ओघाने आठवणार्‍या काही गोष्टी सांगावश्या वाटल्या, म्हणून हा प्रपंच…

तशी सगळ्यानांच आपली आई इतरांच्या आई पेक्षा छान आणि ग्रेट वाटते.आणि वाटलीच पाहिजे…..पण माझ्या आईला मी एकच विशेषण लहानपणापासून जोडलाय आणि ते म्हणजे “सुपर मॉम”.

लहानपणी “सूपरमॅन” मूवी पहिला होता…….त्यात जसा तो सूपरमन खूप पॉवरफुली सगळे करत असतो आणि तरीही थकत नसतो, तशीच माझी आई….म्हणून आईसाठी हे विशेषण सुचल असाव.  मला आज ही असा वाटत की “शी इस बॉर्नड विथ सूपरनॅचुरल स्ट्रेंथ अँड पॉवर” का ते सांगते……

माझी आई…सेंट्रल गवर्नमेंट हेल्थ स्कीम मधे ऑफीसर आहे..आई चे वडील म्हणजे आमचे आजोबा हे सुद्धा सरकारी नोकरीत असल्यामुळे आमच्या आई ने सरकारी नोकरी स्विकारली यात आश्चर्य अस काहीच नाही.  तर माझी आई. मुळातच कष्टाळू स्वभावाची. आम्ही लहान होतो तेव्हा पहाटे (४.३०-४:४५) ला उठून आमचे डबे, आंघोळी शाळेची तयारी, घरातील केर कचरा, कपडे अशी अगणित काम आवरून ती आम्हाला आजीच्या घरी सोडायची आणि तिथून मग ऑफीसला जायची. (आई आमच्या सोबत 8 ला घर सोडायची त्यामुळे त्या आधी कोणतीही कामवाली बाई घरी यायला तयार नसायची) बर ऑफीस पण व्हीटी ला(हेड ऑफीस). त्यामुळे ट्रेन मधून लटकत जायाच चर्चगेट पर्यंत आणि मग २० मिनिटे चालत व्हीटीला जायच..शाळेत पोचवायला आजी आजोबांपैकी कुणीतरी यायच आणि परत आणायची जबबदारी वडिलांची……पुन्हा ऑफीसवरुन ७-७.३० ला येऊन रात्रीच जेवण मग भांडी, किचनचा ओटा आवरून पुन्हा दुसर्या दिवशीच्या भाजीची तयारी करा…..हे सगळ करता करता रात्रीचे ११-११:३० वाजायचे तिला झोपायला….पप्पा जेवणासाठी, चहा पाण्यासाठी, बाजार हाट करण्यासाठी तिला मदत करायचे..तिचे हे कष्ट आठवले की अंगावर काटा येतो माझ्या…..

मला रोज शाळेत सोडायला किंवा आणायला इतर मुलांप्रमाणे माझी आई येत नसे. याच मला खूप वाईट वाटायाच. खरतर काही मुलांच्या/मुलींच्या आई ज्या मुलांना शाळेत सोडायला यायच्या त्या शाळा भरायच्या आधी गेटबाहेर वर्गवार जी रांग लागलेली असायची त्यात आपल्या मुलाला सुरवातीला घुसवयाच्या…..आणि घुसणार्‍या मुलांकडे आम्ही रागाने पाहील की ती मुले भुवया उंचावून….”बघ माझी आई आलीय, नाव सांगेन हा” अशा अविर्भावत डोळ्यातूनच प्रत्युत्तर द्यायची. तेव्हा मला तसा तोरा कधीच मिरवता आला नाही.( रादर माझ्या आई ने कधीच मला तस रांगेत घुसवल नसत हे ही तितकच खर..) पण तरीही माझी आई एक वर्किंग वुमन आहे याचा मला प्रचंड अभिमान वाटायचा……पण माझ्या मनातील खंत मी तिला बोलून दाखवायचे..तेव्हा शनिवार तिच्या ऑफीसला सुट्टी असली की ती मला न चुकता शाळेत सोडायला यायची….आणि मी पण मान ताठ करून आज काहीतरी विशेष घडतय या अविर्भावत चालायचे.

आमच्या अभ्यासाकडे, रेग्युलर आक्टिविटीज कडे पण तीच बारीक लक्ष असायच.  ती जरी एक नोकरी करणारी आई असली तरी एक गृहकृत्य दक्ष गृहिणी ही आहे हे नमूद करायलाच हव…..तिने जितक्या पारंगत पणे तीच घर संभाळल आहे तितक्याच हुशारीने आणि मेहनतीने स्वत:चं करियर केल आहे…….

पण तरीही कुठून ही रोज एवढ बळ आणायची रादर आणते असा प्रश्न मला आजही पडतो…… शी मस्ट बी अ सुपरवुमन…..

जर भविष्यात ही वेळ माझ्यावर आली तर मला हे जमेल का??? प्रश्‍न अनूत्तरीत असलेलच बरा… 😉

आमचे चौकोनी जग....आणि सुपर मॉम

 

मी अकरवीला असताना सकाळच ६ ला घर सोडायाचे क्लासेससाठी आणि तिथून कॉलेजला आणि मग रात्री घरी यायला ७:३० वाजून जायचे….. १२-१३ तासाहून जास्त वेळ आपला कोकरु घराबाहेर राहणार म्हटल्यावर आईचा जीव कसा राहील…ती मला 2 निरनिराळे डबे करून द्यायची. झाल तिच्या नेहमीच्या कामात अजुन एका कामाची भर…..माझी आंघोळ आटोपली की मला किचन मधे तिच्या शेजारी बसवायची…..पहिली गरमागरम चपाती काढून मला भाजीबरोबर किंवा चहा बरोबर खायला घालायची….कल्पना करा मी सकाळी 5.30 वाजता ब्रेकफास्ट करायचे…भूक नसेल तरी खा…असा तिचा आदेशाच असायचा…..त्यामुळेच दुपारी 11 पर्यंत(म्हणजे क्लास चा ब्रेक होईयारयंत) भूक लागायची नाही.

मला आजही किचनमधल्या त्या शेगडीची, गरम चपातीची उब जाणवते..पण ती उब खरतर आईच्या मायेची आहे…मी पण अगदी लहान बाळसारखीच तिच्या मांडिला मांडी खेटूनच किचन मधे तिच्या शेजारी बसायचे. बर करायला सोप्प म्हणून कधी ब्रेड जम किंवा बटर घेऊन जा ……असा कधीच व्हायच नाही. रोज एक डबा भाजी पोळीचा आणि एकात उपमा, नाहीतर पोहे नाहीतर शिरा नाहीतर थालीपीठ असे पौष्टिक आणि वेग वेगळे पदार्थ द्यायची……तेव्हा तर दोन दोन डबे करण्यासाठी बिचारी ४ पासूनच जागी असायची…….काय झोप मिळत होती असेल तिला??? पण मला एकही असा दिवस आठवत नाही जेव्हा तिने आम्हाला कुणालाच बिना डब्याच किंवा बिना जेवणाच ठेवल असेल…कधी कंटाळा नाही केला. तिचे ते कष्ट पाहून माझ्या डोळ्यात पाणी यायच.. म्हणून न चुकता तिच्या पायाला हात लावल्याशिवाय मी घराबाहेर पडायचे नाही..तिच्या आशीर्वादाची अपेक्षा नसायची ती जे कष्ट करत होती त्यासाठी माझी ती एक प्रेमळ पोचपावती होती. आजारी असतानाही आम्ही नको नको म्हणत असतानाही ती उठून सगळं करायची….पैसे खर्चून बाहेरच अनहायजेनिक आणि आचराट खाण आम्ही खाव हे तिला मंजूर नाही…….

इतक सगळ ती निस्वार्थ भावनेने करते….का…कशासाठी? आणि मी आजवर काय केलय तिला बर वाटाव म्हणून????

या प्रश्नाच उत्तर शोधत असताना ते असंख्य क्षण माझ्या नजरेसमोरून गेले जेव्हा मी आईला दुखावल असेन……कधी तिला उलट उत्तर करून, तर कधी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून, कधी तिच्या मनाविरुद्ध वागून, तर कधी तिच्याशी कळत नकळत खोट बोलून….

तिने माझ्यावर इतक्या असंख्य उपकरांचा डोंगर रचून ठेवलाय, ठेवतेय आणि ठेवेल पण मी मात्र किती तरी वेळा माझ्या वागण्याने तिच्या मायेशी प्रतारणा केली असेन..

लहानपणी माझी अखंड बडबड, न थांबणरे प्रश्‍न या सगळ्यांना सय्यम बरतून आणि कौतुकने उत्तर देणार्‍या माझ्या आईचे दोन शिस्तीचे बोल जर मला कधी कटकट वाटले असतील तर एक माणूस म्हणून मला काय संवेदना आहेत? जिने माझ्यासाठी स्वत:च जग मर्यादित करून घेतल आज तिच्यासाठी जर मी दोन क्षण काढू शकत नसेन तर तिचे कष्ट मला भिडलेच नाहीत. मला चालता, बोलता येत नसतानाही माझी तहान, भूक एवढाच न्हवे तर माझी प्रत्येक गरज ओळखणार्‍या आईला आज भांडताना किती सहज पणे मी बोलून गेले “आई, तुला काही कळतच नाही ग”

आई आपल्याला टोकेल म्हणून छोट्या मोठ्या थापा मारण, बाहेरचा राग घरी येऊन आई वर काढण (ते हक्काच ठिकाण असत ना), बरेचदा बिचारीने मेहनत घेऊन बनवलेल्या जेवणाला शाबासकी न देण, तिला आवर्जून काही हवय, नकोय का ते न विचारण, तिच्याशी भांडंण झाल की रागत आवाज चढवणं, आपली चुक असली नसली तरी गाल फूगवून बसण, बर पुन्हा झालेल्या गोष्टीसाठी तिची माफी न मागण (कारण सगळ थोड्या वेळात पूर्ववत होणारच यासाठी तिला गृहीत धरण)…..अशा एक ना अनेक अपराध मी आजतगायत केले असतील…ज्यासाठी आई ने मला कधीच शिक्षा केली नाही उलट जास्त प्रेमच केल…

मला आज माझ्या अशा असंख्य कृत्त्यांबद्दल स्वत:चा राग येतोय आणि तेवढ्याच तीव्रतेने आईची आठवणही येतेय…..

तिला खूपदा सांगण्याचा प्रयत्न करते की मला जाणीव आहे तिच्या कष्ठांची आणि त्यागाची……माझ ही तिच्यावर खूप प्रेम आहे…मला त्या असंख्या चुकांसाठी तिची माफी मागायची आहे ज्यामुळे तीच मन दुखवल गेलय…..पण जेव्हा कधी हा प्रयत्न करते तेव्हा तोंडातून शब्द फुटत नाही आणि मी फक्त तिला मिठी मारते….

तिला कदाचित सगळ समजात असाव म्हणून ती ही काहीही न बोलता फक्त माझ्या पाठीवरुन मायेने हात फिरवते…..आणि माझ्या डोळ्यात टाचकन पाणी उभ राहत………

इथपर्यंत पोस्ट पूर्ण केली आणि माझा सेलफोन वाजला…..पाहील तर आईचा सेल नंबर होता…..मला कळेनासेच झालं ….काय हा योगायोग…मी आठवण काढत होते म्हणून उचकी वगैरे लागली की काय हिला ??? मी फोन उचलला आणि म्हटल काय ग आई??? जनरली संध्याकाळी फोन करतेस आज अगदी दुपारीच केलास????

तर ती म्हणाली अग आज दादाचा वाढदिवस आहे ना…..मी विचार करतेय दर वेळेस आपण हॉटेल मधे जाउन वाढदिवस सेलीब्रेट करतो आज घरीच काहीतरी बनवूया का?? मी हो म्हटल तर तिच्या उत्साहाला काय उधाण आल आणि तिने लगेच इडली आणि मैसोर डोसा असा बेत फिक्स केला आणि मैसोरमसाला डोसा रेसिपी माझ्याबरोबर डिस्कस करूनपण झाली….मी फक्त तीच बोलण ऐकत होते ……काहीच बोलत न्हवते…..तर तीच म्हणाली काय ग तुपा कामात आहेस का? मी म्हटल नाही ग मी तुलाच फोन करणार होते…..तुला कस काय कळल तर म्हणाली अचानक मनात आल, तुझा आवाज ऐकवासा वाटला म्हणून फोन केला….

खरच मूळ जन्माला आल्यावर त्याची नाळ कापून त्याला आईच्या देहापासून वेगळ केल जातं पण हे किती वरवरच…….तिच्या आत्म्याशी जुळलेली आपली नाळ कधीही कापता येणार नाही…….

हे शेअर करा:

  • Email

Like this:

Like Loading...

मुंबई मराठी ब्लोगर्स मेळावा २०१०

11 मंगळवार मे 2010

Posted by truptisalvi in Uncategorized

≈ 13 प्रतिक्रिया

पुण्याच्या यशस्वी ब्लोगर्स मेळाव्यानंतर, मुंबई मधील काही ब्लोगर्स मित्रांमधे असा मेळावा मुंबई मधेही आयोजित करण्यात यावा अशी कुणकुण सुरू होती… बरयाच ब्लोगर्सनी या प्रस्तावासाठी आपल्या माना डोलावल्या. हळू हळू बरयाच चर्चा सत्रांनंतर आणि ब्लोग दुनियेतील काही जुन्या जाणत्या माणसांनी पुढाकार घेऊन हा मेळावा आयोजित करण्याचा आराखडा आखला. तारीख आणि जागा ठरली आणि नेटभेट, मराठी ब्लोग विश्व सारख्या ब्लोगींग साईट्स वर जाहीर निमंत्रण करण्यात आले. 

 या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कांचन कराई, महेन्द्र कुलकर्णी आणि रोहन चौधरी हे होते. कांचन ताईने स्वत: सर्व ईच्छुक ब्लोगर्सना मेल पाठवल्या, त्यांच्या शंकाच समधान वैयक्तिक रित्या केलं…तिचा उत्साह तीने पाठवलेल्या मेल्स आणि निमंत्रण पत्रिकेमधून झळकत होता. बरयाचशा पडद्यामागच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला. त्याबद्द्ल त्या सर्वांचे अभिनंदन.

 ९ मे २०१०…कार्यक्रम स्थळी अर्थात दादर पश्चिम येथिल “दादर सार्वजनिक वाचनालय” इथे जाण्यासाठी मी बाहेर पडले आणि कळलं की मेगाब्लोकमुळे रेल्वे गाड्यांचा गोंधळ सुरु आहे. अपेक्षे पेक्षा आपण उशिरा पोहचणार याची मला कल्पना आली. मी जेव्हा पोहोचले तेव्हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला होता. ओळख सत्र सुरू होते. सर्व उपस्थित ब्लोगर्स आपली आणि आपल्या ब्लोग ची ओळख करून देत होते. मी सभाग्रुहात पोहोचताच तिथल्या कार्यकर्त्यांनी मला माझ्या सांकेतिक कोड नुसार असलेला बैच दिला. मी पटकन जाऊन पंख्याखालची खुर्ची पकडली. सहजच एक नजर सभाग्रुहावरून फिरवली तर लक्षात आले कि छोट्या आर्यन पासून ते ज्येष्ठ नागरीकांपर्यंतच्या सर्व वयोगटातील ब्लोगर्सनी हजेरी लावली होती. ओळख सत्र पार पडत होते आणि दरम्यान गरमागरम बटाटेवडे आणि कटलेट पण सर्व्ह होत होते. काही वाचकांनीही यात उत्स्फुर्त प्रतिसाद दाखवून आपली मते मांडली.

 त्या नंतर एक लकी ड्रो आयोजित करून तीन ब्लोगर्सना सलिल चौधरी (नेटभेट चे संचालक) यांच्या हस्ते पुस्तके प्रदान करण्यात आली. माफ करा..पुस्तकाचे नाव आठवत नाहीये.

 त्यानंतर चर्चा सत्र सुरू झाले. ब्लोगींगमधील काही तांत्रिक अथवा ईतरही काही अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. हे फारच उपयुक्त सत्र वाटले. दरम्यान उरलेल्या बटाटेवड्यांवर काही खवय्यांनी आडवा हात मारला 😉  चर्चासत्र रंगले असतानाच श्री. मिलिंद वेरलेकर पुण्याहून आले. त्यांनी राजा शिवाजी डोट कोम या त्यांच्या आगामी जगातील सर्वात मोठ्या web-encyclopedia ची सविस्तर माहिती सांगितली. त्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि त्याबद्दल असलेला अभिमान त्यांच्या संभाषणातून झळकत होता. मला खूप कौतुक वाटले त्यांचे.

रात्री ८-८.१५ च्या आस पास कांचन ताईने औपचारिकपणे कार्यक्रम संपल्याची घोषणा केली पण तरीही चर्चा सुरूच होती. आणि पुन्हा एकदा असा मेळावा नव्हे संमेलनच भरवण्यात यावे असे सर्वांचे एकमत झाले. त्यानंतर समूह चित्र अर्थात ग्रूप फोटो चा कार्यक्रम झाला. आणि हळू हळू सर्व एकमेकांचे निरोप घेऊन घरी जाऊ लागले.

एकंदरीतच माझ्यासारख्या नवख्या ब्लोगर ला हा सोहळा आणि ईतर ज्येष्ठ ब्लोगर्स चे लाभलेले सान्निध्य हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  

 

हे शेअर करा:

  • Email

Like this:

Like Loading...

यू-टर्न

02 शुक्रवार एप्रिल 2010

Posted by truptisalvi in Uncategorized

≈ 4 प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वी प्रबोधनकार ठाकरे नाट्यग्रुहामधे यू–टर्न हे नाटक पाहण्याचा योग आला. लेखन, दिग्दर्शन आणि गीते आनंद म्हसवेकर यांनी केली आहेत. नेपथ्य राजन भिसे आणि संगीत अवधूत गुप्ते यांच होत. दोन पात्रीच नाटक आहे…गिरीश ओक आणि ईला भाटे…. नाटक कोणत्यातरी गंभीर विषयावर असणार हे ग्रुहितच धरल होत…तिकिटावर नाटकाच हेडिंग “स्त्री–पुरुष नात्यामधील गोड गुंता” अस दिलं होत….एक घटस्फ़ोटीत आर्मी मधील रीटायर मेजर जो एका companion च्या शोधात असतो…त्यासाठी तो रीतसर वर्तमान पत्रामधे जाहिरात ही देतो..आणि एक विधवा पन्नाशीकडे झुकलेली स्त्री सौ. रमा गोखले जिचा मुलगा नोकरीनिमित्त लंडनला असतो. ही बाई पन्नाशीकडे झुकलेली असली तरी तिचा उत्साह, तिचा अवखळपणा हा मात्र एका सोळ्या वर्षाच्या मुलीसारखाच…लाफ़्टर क्लब ला जाऊन सतत हसण्याची सवय, टिपिकल पुणेरी संस्कार आणि बायकांमधे असते तशीच युक्तीवाद करण्याची लकब… मेजर वैद्य मात्र याहून अगदि भिन्न. आर्मीत असल्यामुळे शिस्तप्रिय आणि बेशिस्त सिविलीयन्सचा राग करणारे. वरकरणी रागीट वाटणारे व्यक्तीमत्व. अनायसे या दोघांची भेट होते…त्यांनी एकमेकांबद्दल प्रथमदर्शनी बनवलेली मते…मग हळू हळू त्या वरकरणी व्यक्तिमत्वातून खोलवर डोकावणारी त्यांची मने जुळतात ती फ़क्त एकाच साम्य गोष्टीमुळे आणि ती म्हणजे “एकटेपणा“. आणि मग हे दोघे एकमेकांचे “COMPANION” होण्याचा निर्णय घेतात. एकमेकांची सोबत त्यांच्या आयुष्याला एक वेगळ वळण देते..पण दोघांच्यांही मुलांना त्यांचा हा निर्णय मान्य नसतो आणि त्यातून मग त्यांच्यातील पालकाची त्यांच्याच मुलांनी केलेली हार आणि झालेली भावनीक गुंतागुंत यावर हे नाटक बेतलेलं आहे. दोन्ही पात्रांचा अप्रतिम आणि संवेदनशील अभिनय कथा अधिकच रंगवतो. मध्यंतरापूर्वीचा एक भाग थोडा मंद वाटतो आणि पुढे काय होईल याची फारशी उत्सुकता जाणवत नाही कारण सर्वसाधारणपणे आपण अंदाज बांधायला सुरुवात करतो आणि कथा तशीच पुढे सरकते. या नाटकातील काही वाक्ये विचार करायला प्रव्रुत्त करतात. नायिकेला डायरी लिहिण्याची सवय असते. मेजरला पहिल्यांदा भेटल्यावर ती त्यांच्याबद्दल आपल्या डायरीमधे लिहीते : “काटे असणारया बरयाचशा वनस्पती या फ़क्त वाळवंटात असतात आणि त्याही वाळवंटाएवढ्याच रुक्ष समजल्या जातात…निवडुंगाला आपल हिरवेपण टिकवून ठेवण्यासाठी काटे असतात पण मग सुंदर अशा गुलाबाला का म्हणून काटे असावेत??? आणि त्याला काटे असले तरी त्याची बरोबरी निवडुंगाशी नाही करता येणार.” कठोर आणि रुक्ष वाटण्यारया मेजर ची द्रवलेली बाजू जेव्हा ती पाहते तेव्हा ती लिहिते ..”वर्षानुवर्षे कोरड्या पडलेल्या कातळालाही पाझर फुटतो..आणि वठलेल्या व्रुक्षालाही जेव्हा पालवी फुटते तेव्हा प्रश्न पडतो की जर पुन्हा पालवी फुटायचीच होती तर तो व्रुक्ष वठलाच का???”सरतेशेवटी जेव्हा आपल्या मुलाच्या आणि मेजरच्या मुलीच्या नाराजीपुढे नायिका झुकते तेव्हा ती मेजर ला सोडून जाण्याचा निर्यण घेते आणि मग मात्र मेजर अगतिक होतो आणि अव्यक्त शब्दात नयिकेला नजरेतूनच सांगून जातो की ” मला तूझी सोबत हवी आहे आणि तूलाही माझी” आणि जाताना तो तिला सांगतो “आज तू हा निर्णय घेतलास पण पुढे जर कधी तुला माझी साथ हवीशी वाटली तर स्वतावर अन्याय करू नकोस” हे वाक्य ऐकून नायिका दारापाशीच थांबते…ती पुढे यू–टर्न घेऊन नायकाकडे परतेल का? हा प्रश्न लेखकाने अनुत्तरीच ठेऊन नाटकाचा अंत केलाय.आपली पिढी कितीही पुढारलेल्या विचारांची असली तरी एक स्त्री आणि पुरुषामधे शारीरिक ओढी शिवाय एक मानसिक ओढही असू शकते हे समजायला आपण अजुनही कमी पडतो. वयाच्या एका विशिष्ठ वळणावर जर आपला जोडीदार आपल्या बरोबर नसेल तर जिवनाला आलेली पोकळी भरून काढणे हे केवळ अशक्यच..आणि जर ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला गेला तर लोकं काय म्हणतील आणि त्याहीपेक्षा आपलीच माणसं काय म्हणतील? या विचाराने आपण स्वताचीच केलेली घुसमट आपल्याला एक असंतुष्ट आयुष्य जगायला भाग पाडते. प्रेम आणि हव्याहव्याशा वाटणारया सहवासाची ओढ ही फ़क्त तरुणाईतच असावी किंवा असली पाहिजे हे अगदि चुकीच विधान आहे…आणि या भावनांना वयाच बंधन नसतच मुळी…मग ती स्विकारण्यासाठी ते बंधन का असावं??   

हे शेअर करा:

  • Email

Like this:

Like Loading...

Hello world!

09 मंगळवार फेब्रुवारी 2010

Posted by truptisalvi in Uncategorized

≈ 3 प्रतिक्रिया

Welcome to WordPress.com. This is your first post. Edit or delete it and start blogging!

हे शेअर करा:

  • Email

Like this:

Like Loading...

Follow थेट दिल से on WordPress.com

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 473 other subscribers

अलीकडील पोस्ट

  • मिड्ल क्लास
  • वेळ नाही मला
  • बाबा हवा होतास तू
  • ओक्टॉबर मुंबई 2015 विशेष
  • भय इथले संपत नाही…
  • तुझी नी माझी प्रीत सख्या…
  • सी वर्ल्ड आणि रिवर ट्यूबिंग
  • अनाम प्रेम
  • बाळकडू
  • धूर-धडाका

Top Posts & Pages

  • मिड्ल क्लास
  • वेळ नाही मला
  • बाबा हवा होतास तू
  • ओक्टॉबर मुंबई 2015 विशेष
  • भय इथले संपत नाही...
  • तुझी नी माझी प्रीत सख्या...
  • सी वर्ल्ड आणि रिवर ट्यूबिंग
  • अनाम प्रेम
  • बाळकडू
  • धूर-धडाका

आर्चिव्ह्ज

  • डिसेंबर 2016 (1)
  • नोव्हेंबर 2016 (1)
  • ऑक्टोबर 2016 (1)
  • ऑक्टोबर 2015 (1)
  • मार्च 2012 (1)
  • फेब्रुवारी 2012 (1)
  • ऑक्टोबर 2011 (1)
  • फेब्रुवारी 2011 (1)
  • जानेवारी 2011 (1)
  • नोव्हेंबर 2010 (3)
  • जुलै 2010 (1)
  • जून 2010 (2)
  • मे 2010 (3)
  • एप्रिल 2010 (1)
  • मार्च 2010 (2)
  • फेब्रुवारी 2010 (1)

प्रवर्ग

  • आपले सण
  • उपहास
  • कवितेचा कुंचला
  • येता-जाता
  • लघुकथा
  • सामाजिक
  • Uncategorized

Blog Stats

  • 24,072 hits

“मराठी ब्लॉग विश्व”

Create a free website or blog at WordPress.com.

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy
  • Follow Following
    • थेट दिल से
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • थेट दिल से
    • सानुकूल करा
    • Follow Following
    • Sign up
    • लॉग ईन
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar
 

Loading Comments...
 

    %d bloggers like this: