टॅगस्

, , ,


भूताखेताबद्दलचे न्हवे तर न संपणा-या परिक्षांचे. शाळेत असताना वाटायच या सारख्या येणा-या घटक चाचण्या मग सहामाही मग पुन्हा चाचणी आणि मग अजस्त्र अशी भासणारी वार्षिक परीक्षा पाठलागच सोडत नाहीत. एक संपतेय आणि निकालपत्र हाती पडतय ना पडतय तोवर दुसरीचं वेळापत्रक नोटीस बोर्डवर चिकटलेलं. खरतर लेखी पेक्षा तोंडी परिक्षेच्या वेळेसच तोंडच पाणी पळायचं. पेपरात काय लिहितोय हे आपल्यापुरतच फार फार तर तपासणा-या शिक्षकांपुरतच मर्यादीत असायचं, पण तोंडी परीक्षेला संपूर्ण वर्गासमोर आरोपीच्या पिंज-यात उभ केल्यासारख वाटायच. आपला टर्न येउन गेला की मगच दुस-याला तोंडघशी पडताना पाहून मजा वाटायची.

दहावी संपली आणि वाटल आता आपण थोडे मोठे झालो आहोत. कॉलेजला जाणार. तेव्हा तिथल्या आयुष्यासारखच (हिंदी मुव्हीज मधे दाखावतात तस) परीक्षांच वेळापत्रकही “रीलॅक्स्ड” असेल…पण कसल काय…बारावी आणि मग कुठल्यातरी चांगल्या प्रोफेशनल कोर्से साठी (मेडीकल आणि अभियांत्रिकी य दोनच विक्ख्यात प्रक्ख्यात आणि थोरामोठ्यांना माहीत असणा-या शाखा) वाहत्या पाण्यात सूर मारण्याची तयारी सुरू करावी लागली. तेही पार पडल एकदाच.

जस पाषाणयुग, लोहयुग, कलियुग तस काही वर्षांपूर्वी आलेल्या “अभियांत्रिकी” युगातल्या इतर प्राणीमात्रांप्रमाणेच मी सुद्धा एंजिनियरींगला ॲडमिशन घेतल. इथे तर वेगळच विश्व. परिक्षांच स्वरूप सेमिस्टर पॅटर्न मधे बदलल आणि भितीचही.(आणि मजेचही 😉 ) परीक्षेच्या दिवशी “अरे कुछ नही पढा है यार” हे वाक्य दहा पैकी नऊ जणांच्या तोंडी तरी हमखास असायच. आणि निकाल पहायच्या वेळेला “मुखी गोड नाम असावे श्रींचे आणि पोटी उमटावे कड भितीचे” असली कसली गत व्हायची.

“ओरल”…इंजिनियरींगचे विद्यार्थी यावर पानोंपानांचा निबंध लिहू शकतील एवढी या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. “एक्सटर्नल” नामक एरव्ही अतिसामान्य वाटेल असा माणूस ओरलला गव्हर्नर च्या तो-यात खुर्चित बसून आमच्या ज्ञानाची अक्षरश: चिरफाड करायचा. यादिवशी मात्र कॉलेजात हिरोगिरी करणारी पोरंसुद्धा शर्ट इन करून, केसाचा भांग पाडून अगदी सज्जन बनून यायची. जो जास्त बोलण्याच्या फंदात पडला तो गेलाच बाराच्या भावात. जी कोणी मुलं ओरल देऊन बाहेर यायची, बाकीच्या मुलांचा घोळका त्यांच्या भोवती जमायचा. ” ए क्या पुछा? बता ना…” मग त्याने सांगितलेल्या प्रश्नोंत्तरांची शोधाशोध सुरू व्हायची. एखादा त्यातलाच कथाकार निघाला तर आत घडलेल्या आणि न घडलेल्या अशा दोन्हीही कथा अगदी रंगवून रंगवून सांगायचा.

नग समजल्या जाणा-या आणि प्रोफेसरांच्या डोळ्यात खुपणा-या मुलांचा चांगलाच उद्धार ओरलमधे व्हायचा. (आता प्रोफेसर लोकांना विचित्र विचित्र पाळीव नाव (पेट नेम्स) ठेवून त्यांना कॉलेजभर प्रसिद्ध केल्यावर काय यांच कोड-कौतुक होणार आहे?) पण गप्प बसतील तर ती अवली मुलं कुठली? कॉलेजच्या ॲन्युअल गॅदरींगला स्वत:च अनामिक नावाने असे काही फ़िशपोंड लिहायची की प्रोफेसर ओशाळून लाल-लाल झालेच पाहिजेत. तेव्हा एरव्ही गुणापत्रिका पाहून यांच्या बौद्धिक क्षमतेवर शंका घ्यावी की यांच्या कवी मनाने घेतलेल्या भरारीच कौतुक कराव हा प्रश्न पडायचा.

असो विषयांतर होतय. तर अशीही परीक्षेची भिती डिग्री नंतर संपवून टाकायची अस ठरवल आणि नोकरी धरली. इथेही ट्रेनी म्हणून दाखला मिळाला आणि चांगल प्रोजेक्ट मिळाव म्हणून परीक्षा सत्र सुरूच. 🙂

शाळा कॉलेज संपल तरी आजही मला परीक्षेची स्वप्न पडतात ज्यात शेवटच्या क्षणापर्यंत माझा काहिही अभ्यास झालेला नसतो आणि मी फक्त पुस्तकांची पान पलटत असते. मला खात्री आहे तुमच्यापैकी ब-याच जणांना थोड्या फार फरकाने ही अशी स्वप्न पडतच असणार.

व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्हीही पातळींवर आपण नेहमीच अशा परीक्षांना तोंड देत असतो. फक्त त्यांच आणि त्यांच्या ब्रोबर येणा-या भितीच स्वरूप वेगवेगळ असत. घटक चाचणीपासून ते अगदी वधू-वर परीक्षेपर्यंत आपल्या गुणांचा (आणि अवगुणांचाही 🙂 ) कस लागत असतो. कधी डिस्टिंक्शन , कधी फर्स्ट क्लास मिळवून तर कधी अपयशाची पहिली, दुसरी, तिसरी…जोपर्यंत यश मिळत नाही तोवर पाय-या चढत चढत वर जात रहायचं.